Indirect Tax: मोदी सरकारच्या अंतर्गत 1 फेब्रुवारी 2024 रोजी अर्थ मंत्रालयाकडून अर्थसंकल्प सादर केला जाईल. मात्र बाकी साधारण अर्थसंकल्पांप्रमाणे याची मर्यादा काही एका वर्षासाठी वैध नसेल. कारण हा काळ निवडणुकीचा असल्यामुळे नवीन सरकार स्थापनेपर्यंतच निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या बजेटचा वापर करण्यात येईल. दोन्ही सरकारांमध्ये समतोल साधणाऱ्या अर्थसंकल्पाला ‘इंट्रीम बजेट’ असं म्हटलं जातंय. अर्थमंत्री म्हणून कार्यरत असलेल्या निर्मला सीतारामन यावेळी त्यांच्या कारकिर्दीतलं सहावं बजेट भारतासाठी सादर करतील. मात्र अर्थसंकल्प समजून घेताना आपण सरकारला नेमका कुठला कर भरतो आणि का हे माहीत असणं अनिवार्य आहे. आपल्या देशातील प्रत्येक व्यक्ती आणि कॉर्पोरेट संस्था सरकारला वेळोवेळी कर भरत असतात. त्यांच्या उत्पन्नावर, वस्तूंवर आणि सेवांवर हे कर लागू केले जातात आणि प्रत्येकालाच सरकारला कर भरण आहे अनिवार्य आहे.
सरकारला कर भरण्याचे प्रकार कोणते?
देशातील प्रत्येक माणसाकडून केंद्र सरकारला भरण्यात येणारा कर हा दोन प्रकारचा असतो, ज्यात प्रत्यक्ष कर (Direct Tax) आणि अप्रत्यक्ष कर(Indirect Tax) असे दोन प्रकार पाहायला मिळतात. प्रत्यक्ष कराची भरपाई ही त्याच्या नावाप्रमाणेच प्रत्यक्ष म्हणजेच थेट केली जाते. अप्रत्यक्ष कराची वसुली मात्र थेट केली जात नसली तरीही या-ना-त्या मार्गाने हा कर भरावाच लागतो. GST हे अप्रत्यक्ष कराचे सर्वसामान्य उदाहरण आहे. अप्रत्यक्ष कराचा पुरवठा बाजारातील साखळीमधल्या एका घटकाद्वारे गोळा करून सरकारला केला जातो. वस्तू किंवा सेवेच्या खरेदी किमतीचा एक भाग म्हणून उत्पादक किंवा किरकोळ विक्रेत्याद्वारे हा कर ग्राहकच भरत असतात.
देशात लागू होणाऱ्या काही अप्रत्यक्ष करांबद्दल आज थोडक्यात माहिती घेऊया: (Indirect Tax)
१) सेवा कर(Service Tax:):
हा एक प्रकारचा अप्रत्यक्ष कर असून संस्थेद्वारे प्रदान केलेल्या सेवांच्या बदल्यात तो लावला जातो, समाजाकडून सेवा कर जमा करणे ही भारत सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे.
२) मूल्यवर्धित कर(Value added tax):
तुम्ही VAT(Value-Added Tax) हा कर प्रकार ऐकला असेल. हा एक प्रकारचा अप्रत्यक्ष कर आहे जो ग्राहकाला थेट विकला जाणाऱ्या जंगम उत्पादनावर(Movable Products) लावला जातो.
३)उत्पादन शुल्क(Excise duty):
देशात विविध प्रकारची उत्पादने होत असतात, अनेक कंपन्या तसेच व्यावसायिक वर्गाकडून दरवर्षी नवनवीन उत्पादनांना सुरुवात केली जाते. देशातील कुठल्याही कंपनीच्या उत्पादनावर किंवा वस्तूवर लावलेल्या कराला उत्पादन शुल्क असे म्हटले जाते.
४) सीमाशुल्क(Custom duty):
कस्टम ड्युटी हा भारतातील सर्वात प्रसिद्ध असलेला कर प्रकार आहे. देशात होणाऱ्या आयातीवर कस्टम ड्युटी आकारली जाते. तर काही वेळा देशातून निर्यात होणाऱ्या उत्पन्नावर देखील कस्टम ड्युटी दाखल करण्यात येते.
यांशिवाय मुद्रांक शुल्क(Stamp Duty), करमणूक कर(Entertainment Tax) आणि सिक्युरिटीज व्यवहार कर(Securities Transaction Tax) हे देखील एक प्रकारे अप्रत्यक्ष कर(Indirect Tax) प्रकार आहेत. भारतात कोणत्याही स्थावर मालमत्तेच्या हस्तांतरणावर लादलेला कर म्हणजे मुद्रांक कर होय, तसेच हा कर अनेक वेळा कायदेशीर कागदपत्रांवर देखील लागू होतो. आपण देशभरात मनोरंजन आणि करमणूक करण्यासाठी विविध चित्रपट, क्रीडा उपक्रम, गेमिंग यांचा वापर करतो, या उत्पादनावर लावल्या जाणाऱ्या कराला करमणूक कर असं म्हटलं जातं. आणि सर्वात शेवटी भारतीय स्टॉक एक्सचेंज द्वारे सेक्युरिटीच्या व्यापारदरम्यान लावलेल्या कराला सेक्युरिटी व्यवहार कर असं म्हणतात. भारतात व्यवहार करणाऱ्या प्रत्येक माणसाला भारत सरकारला वेळोवेळी प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष कर भरणे अनिवार्य आहे.