Inflation In India: जगभरात महागाईचा दर दिवसेंदिवस वाढत चालला आहे, वाढत्या महागाईची सर्वाधिक झळ जर का कुणाला बसत असेल तर ती म्हणजे सर्व सामान्य माणसालाच म्हणावी लागेल. श्रीमंत लोकं काही महागाईच्या वाढत्या आकड्यांनी हादरून जात नाहीत आणि समाजातील गरीब जनतेला याचा विशेष फरक जाणवत नाही, कारण मुळातच त्यांच्या गरजा कमी असतात. अश्यावेळी कात्रीत सापडतो तो सामान्य माणूसच. आपल्या प्रत्येकाच्या घरात महिनाभर लागणाऱ्या सामनाचं नियोजन करून ठेवलं जातं आणि अश्यातच अचानक वाढलेल्या आकड्यांमुळे बिचाऱ्या जनतेसमोर नुकसानीला सामोरे जाण्याची वेळ येते. आत्ताच्या घडीला बाजारातील तज्ञांच्या मते जगभरातील महागाई वाढत जाणार आहे, आणि हि वाढ पुढच्या काही महिन्यांसाठी कायम राहील असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. लक्ष्यात घेण्याची बाब म्हणजे बँक ऑफ बडोदाच्या अहवालानुसार आपल्या भारताचा महागाईच्या बाबतीत जगभरात तिसरा क्रमांक लागतो.
भारतात वाढलाय महागाईचा दर: (Inflation In India)
देशातील प्रसिद्ध बँक असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या अहवालानुसार आपल्या देशात वाढलेल्या महागाईचा दर (Inflation In India) लक्ष्यात घेता जगाच्या तुलनेत महागाईच्या बाबतीत आपण तिसऱ्या क्रमांकावर आहोत. देशात महागाईचा दर नोव्हेंबर महिन्यात 5.6 टक्क्यांवर होता, जी कि खरोखरच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण भारत देश हा खास करून मध्यमवर्गीय लोकांचा देश म्हणून ओळखला जातो आणि हा महागाईचा आकडा जर का असाच वाढत गेला तर येणाऱ्या काळात सामान्य माणसाचे जीवन भरपूर कष्टदायक होण्याची शक्यता आहे.
भारताच्या आधी महागाईच्या बाबतीत दक्षिण आफ्रिका आणि रशिया हे दोन्ही देश आघाडीवर आहेत. यातील रशियात महागाई वाढीचा दर 7.5 टक्के तर दक्षिण आफ्रिकेत 5.9 टक्के आहे. जगभरातील बाकी देशांचा आकडा तपासून पहिला तर ऑस्ट्रेलियामध्ये हे प्रमाण 5.4 टक्के तर सिंगापूरमध्ये 4.7 टक्के आणि ब्राझीलमध्ये 4.7 टक्के महागाईचा जोर कायम आहे.
भारतात महागाईचा आकडा वाढण्यात (Inflation In India) सर्वाधिक जर का कुणी जबाबदार असेल तर त्या आहेत खाद्यपदार्थांच्या किमती. मागच्या काही दिवसांत आपण शाकाहारी तसेच मांसाहारी खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींचा आढावा घेतला होता. कांदा आणि टोमॅटो नंतर आता लसूणीचे भाव देखील जोमाने वाढत आहेत. हि बाजारातील परिस्थिती पाहता येणारा काळ हा सामान्य जनतेसाठी कष्टकरी ठरू शकण्याची शक्यता जाणवत आहे.
अशी आहे बाजारी परिस्थिती:
महागाईच्या कचाट्यात सापडलेल्या अनेक देशांची स्थिती साध्य बिकट आहे असे म्हणावे लागेल, भारतात नोव्हेंबर 2023 मध्ये साखरेच्या किंमतीत 41 टक्क्यांनी वाढ झाली होती, तर केवळ एका वर्षात तांदूळ 36 टक्क्यांनी महाग झाला होता. जगभरात महागाईचे प्रमाण वाढणायसाठी आणखीन घटक महत्वाचा ठरतो तो म्हणजे जगभरात सुरु असलेली युद्धाची परिस्थतीती. इस्राएल आणि हमास यांच्यातील युद्ध म्हणा किंवा युक्रेन आणि रशिया यांच्यातील संघर्ष घ्या, युद्धाचा परिणाम हा संपूर्ण जगाला भोगावा लागतोय आणि म्हणूनच जगभरात कच्चे तेल, नैसर्गिक वायू आणि कोळशाच्या किंमतीत मोठी घसरण झालेली पाहायला मिळाली आहे.