Infosys Q3 Results : Infosys चा तिमाही निकाल निराशाजनक; कंपनीचा नफा 7 टक्क्यांनी कमी झाला

Infosys Q3 Results: नारायण मूर्तींची कंपनी म्हणजेच Infosys ही देशातील दुसरी सर्वात मोठी IT कंपनी म्हणून ओळखली जाते. Infosys या कंपनीची कारकीर्द लक्षणीय असल्याने अनेक IT प्रोफेशनल तरुणांना इन्फोसिस मध्ये काम करण्याची भरपूर इच्छा असते. मात्र यावेळी कंपनीने बाजाराला पूर्णपणे निराश केल्याची बातमी समोर आली आहे. समोर आलेल्या आर्थिक निकालानुसार, कंपनीने अनेकांच्या अपेक्ष्यांचा भंग केला आहे. कंपनीच्या नफ्यात जानेवारी पर्यंतच्या तिमाहीत सात टक्क्यांची घसरण झाल्याने बाजार कंपनीच्या प्रदर्शनावर खुश नाही. गुरुवारी संध्याकाळी इन्फोसिस कंपनीने चालू वित्त वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीबद्दल माहिती शेअर बाजारात मांडली होती. शेअर बाजाराने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार जानेवारीच्या तिमाहीत कंपनीने 6,106 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे, जो की गेल्या वर्षाच्या तुलनेत 7.3 टक्क्यांनी कमी आहे. बाजारातील तज्ञांना कंपनी निदान 6,250 कोटी रुपयांच्या नेट प्रॉफिट कमावेल अशी अपेक्षा होती, मात्र कंपनीने सादर केलेले आकडे पाहता त्यांनी या अपेक्षांवर पुरेपूर पाणी फेरलंय.

इन्फोसिसच्या आकड्यांमध्ये घसरण का? (Infosys Q3 Results)

जुलै ते सप्टेंबर 2023च्या तुलनेत ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 या तिमाहीत इन्फोसिसच्या नफ्यात 1.7 टक्क्यांची घट झाली आहे. बाजारातील तज्ञांच्या मतानुसार यादरम्यान देशभरातील अनेक आयटी कंपन्यांना विविध प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागला होता मुख्यत: फर्लो आणि कमी कामाचे दिवस यामुळे अडचणी येत होत्या आणि म्हणूनच कदाचित इन्फोसिसच्या नफ्याचा आकडा कमी झाला आहे.

TCS (Tata Consultancy Services) ही भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी म्हणून ओळखली जाते. गुरुवारी इन्फोसिस सोबत टीसीएस ने देखील आपल्या नफ्याची माहिती शेअर बाजारात मांडली, ज्यात कंपनीने जानेवारी महिन्यापर्यंतच्या तिमाहीत 11,058 कोटी रुपयांचा नफा कमावल्याची माहिती दिली आहे आणि कंपनीचे आकडे बघता यात दोन टक्क्यांची वाढ झालेली आहे.

इन्फोसिसच्या महसुलात सुधारणा:

तिसर्‍या तिमाहीतील खराब कामगिरीनंतर (Infosys Q3 Results), इन्फोसिसने संपूर्ण वर्षासाठी रेव्हेन्यू ग्रोथ गायडन्स कमी केला आहे आणि आता ते दीड ते दोन टक्क्यांच्या घरात आहेत. जानेवारी महिन्यापर्यंतच्या तिमाहीत कंपनीच्या महसुलात किंचित सुधारणा झाली असून या तिमाहीत कंपनीचा महसूल 38,821 कोटी रुपये झालाय. हा संपूर्ण आकडा एक वर्षापूर्वीच्या तुलनेत 1.3 टक्के अधिक आहे.