बिझनेसनामा ऑनलाईन । प्रसिद्ध IT कंपनी Infosys आपल्या कर्मचाऱ्यांबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. कोरोना काळात लॉकडाउन मुळे जगातील जवळपास सर्व IT कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची मुभा दिली होती, परंतु कोरोना आटोक्यात आल्यानंतर अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमधून काम करण्यास सांगितलं . त्यानंतर आता प्रसिद्ध IT कंपनी Infosys सुद्धा कर्मचाऱ्यांची वर्क फ्रॉम होमची सुविधा बंद करण्याचा विचार करत आहे.
कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम पद्धतीने काम करायचे असेल तर त्यांना त्यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागेल असे Infosys ने सांगितले आहे. तसेच जे कर्मचारी वर्क फ्रॉम होमच्या नवीन नियमांनुसार काम करणार नाहीत त्यांच्याविरुद्ध कंपनी शिस्तभंगाची कारवाई करेल असा इशाराही इन्फोसिसने कर्मचाऱ्यांना दिला आहे. मात्र कंपनीचा हा आदेश फक्त अमेरिका आणि कॅनडातील कर्मचार्यांसाठीच लागू आहे. भारतात काम करणाऱ्या इन्फोसिस कर्मचार्यांसाठी मात्र कंपनीने अशा प्रकारच्या कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत.
यापूर्वी टाटानेही घेतला होता निर्णय –
यापूर्वी टाटा समूहाच्या टीसीएस कंपनीने सुद्धा कर्मचाऱ्यांचे वर्क फ्रॉम होम बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र याचा उलटाच परिणाम पाहायला मिळाला. ऑफीसवर कामाला जाणे शक्य नाही असं म्हणत अनेक कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला, यामध्ये खास करून महिला कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे आता Infosys सुद्धा वर्क फ्रॉम होम बंद केल्यानंतर कर्मचारी काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल.