Israel-Hamas War : इस्रायल- हमास युद्धाचा भारतावर होणार विपरीत परिणाम; काय आहे धोक्याची घंटा?

बिझनेसनामा ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसांपासून इस्रायल आणि हमास युद्धाचा (Israel-Hamas War) परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. अनेक देशांतील आर्थिक व्यवस्थांना यामुळे फटका बसला आहे. आपणही या जगाचा एक भाग आहोत. त्यामुळे याचा थोडाफार फटका आपल्यालाही बसणारच होता. आज जाणून घेऊया अश्या काही महत्वाच्या गोष्टी ज्यांच्यावर या युद्धाचा गंभीर परिणाम झाला आहे, किंवा होण्याची शक्यता आहे. असंही म्हटलं जातंय कि या युद्धामुळे सामान्यातल्या सामान्य माणसाला याचा परिणाम भोगावा लागू शकतो, तो कसा हे आज पाहूयात…

भारतावर असा होईल युद्धाचा परिणाम: Israel-Hamas War

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या युद्धामुळे आपल्याकडे सुरु असलेल्या महागाईत भर पडण्याची दाट शक्यता आहे. दैनंदिन कर्ज ते अनेक प्रकारच्या गुंतवणुका यांवर युद्धाचा झालेला परिणाम दिसून येईल. आपण कच्च्या तेलासाठी इतर देशांवर अवलंबून आहोत, कच्या तेलाच्या किमती जर का वाढल्या तर येणाऱ्या काळात पेट्रोल आणि डीझेल यांच्या किमतींमध्ये वाढ होऊ शकते.

युद्ध (Israel-Hamas War) नेमकं किती काळ चालणार हे कोणालाही निश्चितपणे सांगता येत नाही. पण जर का हे युद्ध दीर्घकाळ सुरु राहिलं तर त्याचा गंभीर परिणाम डॉलर्सच्या किमतींमध्ये दिसून येईल आणि नंतर डॉलर्सच्या तुलनेत रुपयांची किंमत कमी होऊ शकते. एकुणच यामुळे आयात निर्यातीचे भाव बदलतील, सोन्या चांदीच्या किमतीही बदलताना दिसतील. याशिवाय औषधांसह भारतीय व्यवसायावरही विपरीत परिणाम होऊ शकतो.

टेक कंपन्यांवर होणार परिणाम:

अनेक व्यवसायांप्रमाणे टेक कंपन्या काही या चक्रातून सुटणाऱ्या नाहीत. काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं कि युद्धाच्या परिणामी अनेक कंपन्या आपलं बस्तान हलवण्याच्या तयारीत आहेत. सध्या इंटेल, मायक्रोसॉफ्ट आणि गुगलसह इतर ५०० हून अधिक जागतिक कंपन्यांची इस्रायलमध्ये कार्यालये आहेत, आणि कदाचित हे युद्ध असेच चालू राहिले तर या कंपन्या आपली कार्यालये भारतात हलवू शकतात. .