L and T Finance कंपनीकडून आत्तापर्यंत 1.5 लाख ग्राहकांना Insurance Policy

मुंबई, 29 जून 2023 : देशातील अग्रगण्य नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांपैकी एक असलेल्या एल अॅण्ड टी फायनान्स लिमिटेड (L&T Finance) ने समान मासिक हप्ता (EMI) संरक्षण योजनेची अर्थात ईएमआय प्रोटेक्ट प्लॅनची घोषणा केली आहे. कृषी कर्ज ग्राहकांसाठी बाजारातील ही अशा प्रकारातील एक आगळीवेगळी योजना आहे. आतापर्यंत या योजनेत दीड लाखांहून अधिक ग्राहकांना विमा कवच प्रदान करण्यात आलेले आहे.

किमान चार दिवस सलग उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या ग्राहकाच्या कर्जाच्या हप्त्यांसाठी ही योजना एक-रक्कमी निधी प्रदान करते. संपूर्ण कर्ज कालावधीसाठी ग्राहक वर्षातून एकदा या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेंतर्गत जर ग्राहक रुग्णालयात दाखल झाला, तर त्याचा वर्तमान/भविष्यातील देय हप्ता/ हप्ते विमा रकमेच्या मर्यादेपर्यंत ग्राहकाच्या वतीने सबंधित विमा कंपनीद्वारे एलटीएफला अदा केले जाणार आहेत.

सदर योजना 18 ते 60 वर्षे वयोगटातील ग्राहकांसाठी आहे आणि पॉलिसीची मुदत ही कर्जाच्या कालावधीनुसार 2 ते 5 वर्षांच्या दरम्यान असते. कर्जाच्या परतफेडीच्या प्रकारावर आधारित, म्हणजेच मासिक, त्रैमासिक किंवा सहामाही हप्त्यांसाठी विम्याची रक्कम 30 हजार ते 90 हजार रुपयांच्या दरम्यान आहे. ही योजना ग्राहकांना प्रीमियम फंडिंग पर्याय देखील प्रदान करते.

कंपनीच्या शेतकरी ग्राहकांना कोविड महामारीच्या काळात आधार म्हणून जुलै 2020 मध्ये ईएमआय प्रोटेक्ट प्लॅन योजना सुरू करण्यात आली होती. नवीन ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज, टॉप-अप कर्ज किंवा एलटीएफकडून पुनर्वित्त कर्ज घेताना त्यांना या योजनेचा पर्याय देण्यात आलेला होता.

एल अॅण्ड टी फायनान्सच्या शेतकरी वित्तपुरवठा विभागाचे मुख्य अधिकारी श्री. आशीष गोयल कंपनीच्या या विशेष कामगिरीबद्दल बोलताना म्हणाले, “ लक्ष्य 2026 या व्यूहात्मक योजनेवर विशेष लक्ष केंद्रीत केलेले असताना आम्ही उत्पादन-केंद्रितपासून ग्राहक-केंद्रित होण्यावर भर देण्याच्या उद्दिष्टासह, एक उत्कृष्ट, डिजिटल-सक्षम अशी रिटेल फायनान्स कंपनी बनण्यावरही लक्ष केंद्रित केलेले आहे. या उद्दिष्टाच्या अनुषंगाने आम्ही शेतकर्‍यांच्या सुविधांवर आणि त्यांच्या कठीण काळात आर्थिक सहाय्य देण्यावर स्पष्ट लक्ष केंद्रित करून ईएमआय प्रोटेक्ट प्लॅन सुरू केला. विशेष म्हणजे, ईएमआय प्रोटेक्ट प्लॅन आमच्या शेती कर्ज ग्राहकांना कमीत कमी कागदपत्रांसह जलद आणि त्रासविरहीत दावा प्रक्रियेची सुविधा प्रदान करतो. आजपर्यंतया योजनेंतर्गत, आम्ही दीड लाखांहून अधिक शेतकर्‍यांना विमा कवचात समाविष्ट केले आहे आणि शेतकरी समुदायाची सेवा करत एक हजाराहून अधिक दावे निकाली काढलेले आहेत.”

“सध्या ही योजना तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, गुजरात आणि महाराष्ट्र या प्रमुख राज्यांचा समावेश असलेल्या भारतातील सोळा राज्यांमधील सर्व कृषी कर्ज ग्राहकांना प्रदान केली जात आहे,” असे श्री. गोयल पुढे म्हणाले.