Lek Ladki Yojana : सरकारकडून सामान्य नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. विशेषतः या योजना गरजू लोकांसाठी सुरु केलेल्या असतात. गरजू लोकांमध्ये कोणाचा समावेश होतो? तर महिला, शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि मागासलेले लोकं. यांना सवलती देऊन इतरांच्या बरोबरीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने महाराष्ट्रातील मुलींसाठी नवीन योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. लेक लाडकी योजना’ असे या योजनेचे नाव असून या योजनेच्या माध्यमातून सरकार मुलींना लाखो रुपये देणार आहे. तर ही योजना नेमकी आहे तरी काय? त्यासाठी काय पात्रता हवी आणि याचा फायदा कसा करून घ्यावा हे आज आम्ही सांगणार आहोत.
कोणासाठी आहे लेक लाडकी योजना? Lek Ladki Yojana
लेक लाडकी योजना सरसकट सर्वच मुलींसाठी लागू होत नाही. यात काही निकष लागू होतात. पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक मुलींना या योजनेचा भाग होण्याची परवानगी देण्यात आली आहे. याचाच अर्थ असा कि आर्थिक दृष्ट्या असक्षम असलेल्या मुलींना ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्याच या योजनेचा फायदा मिळवू शकतात. तसेच या योजनेद्वारे मिळणारी रक्कम तुम्हाला एकदम मिळणार नाही तर टप्याटप्याने त्याचा लाभ घेता येईल. मुलीचा जन्म होताच 5 हजार रुपयांची रक्कम तुमच्या स्वाधीन करण्यात येईल, तिने पहिल्या वर्गात प्रवेश मिळवल्यानंतर 7 हजार रुपये, शाळा संपवून अकरावीत प्रवेश मिळवल्यानंतर 8 हजार रुपये तर वयाची अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर 75 हजार रुपये सरकार तुम्हाला देऊ करेल. अशाप्रकारे या लाभार्थी मुलींना एकूण 1 लाख 1 हजार रुपये मिळणार आहेत.
महाराष्ट्रातील कुटुंबात 1 एप्रिल 2023 पासून जन्म घेतलेल्या मुलींना या योजनेचा भाग बनवण्यात आलं आहे. एखाद्या कुटुंबात जर का एक मुलगा व एक मुलगी असेल तरीही तिला या योजनेचा फायदा मिळेल. एका कुटुंबात पहिल्यांदाच दोन जुळ्या मुलींचा जन्म झाला तरीही दोघींना स्वतंत्रपणे योजनेचा भाग बनण्याची परवानगी आहे.मात्र त्यानंतर जोडप्याला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे भाग आहे. परंतु समजा एका कुटुंबात मोठी मुलगी असतानाही दोन जुळ्या मुलींचा जन्म झाला तरीही तिन्ही मुलींना योजनेचा पुरेपुरे फायदा मिळणार आहे.
का सुरु केली योजना?
मुलींच्या जन्माबद्दल अजूनही समाजातील विचारसरणी बदलेली नाही. तिच्या जन्मापासून, शिक्षण आणि लग्नाचा खर्च हा अजूनही भार समजला जातो आणि मग स्त्रीभृणहत्ये सारखे वाईट प्रकार घडतात. खालावत गेलेला मुलींचा दर पुन्हा एकदा बरोबरीचा करण्यासाठी सरकारने हि योजना (Lek Ladki Yojana) सुरु केली आहे. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, त्यांचा मृत्यू दर कमी करणे, बालविवाह बंद पाडणे, कुपोषण कमी करणे इत्यादी अनेक उद्देशांसह हि योजना सुरु करण्यात आली आहे.