आता लोन मिळणार काही मिनिटात; बँकेने घेतला मोठा निर्णय

बिझनेसनामा ऑनलाईन । शिक्षण, घर, गाडी यांसारख्या विविध गोष्टींसाठी आपण लोन घेत असतो. मात्र लोन मिळण्याची प्रक्रिया एवढी मोठी असते कि त्यामुळे लोनच नको अशी भूमिका काहीजण घेतात . परंतु आता लोन घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन बँकेने दिली आहे. बँकेने नॅशनल ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस लिमिटेडच्या साहाय्याने ‘प्रोजेक्ट WAVE’ अंतर्गत इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटी (e-BG) सेवा सुरू केली आहे. कागदोपत्री काम कमी करण्याच्या उद्देशाने बँकेने ही सुरुवात करण्यात आली आहे. पूर्वी जे काम करायला 3 ते 4 दिवस लागायचे ते आता काही मिनिटांतच पूर्ण होईल. म्हणजेच आता बँक आणि ग्राहक दोघांचाही वेळ वाचणार असून, पूर्वीपेक्षा काम सोपे होणार आहे. असे बँकेचे म्हणणे आहे.

आता या बँकेच्या ग्राहकांना एंड टू एंड डिजिटल सेवेचा लाभ घेता येणार आहे. म्हणजेच ग्राहकांना वाहन कर्ज सहज मिळावे यासाठी बँकेने डिजिटल वाहन कर्ज सुविधा सुरू केली आहे. या अंतर्गत ग्राहक 25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतात. म्हणजेच बँकेने ग्राहकांसाठी एकाच वेळी अनेक सुविधा सुरू केल्या आहेत.

बँकेची जवळपास संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाइनच होणार आहे. कर्जासाठी किंवा इतर कामासाठी आता प्रत्यक्ष बँकेत जायची गरज भासणार नाही. यापूर्वी, बँकेने डिजिटल परिवर्तन उपक्रमासाठी प्रोजेक्ट WAVE सुरू केला होता. त्यामध्ये ग्राहकांना बँकेकडून अनेक विविध प्रकारच्या सेवा मिळतात. त्यामध्ये भर म्हणून बँकेने ग्राहकांसाठी ई-बीजी सेवाही जाहीर केली आहे. या ई – बीजी सेवेत फिजिकल स्टॅम्प पेपर आणि सही ऐवजी आता ग्राहकांना डिजिटल स्टॅम्पिंग आणि ई-साइनिंगची सुविधा मिळणार आहे.