लवकरच येणार मेड इन इंडिया चिप; Micron प्लांटचे काम सुरू

बिझनेसनामा ऑनलाईन । भारत सध्या प्रगतीच्या दिशेने जोमाने पावलं उचलत आहे. देशातील विविध क्षेत्रांमध्ये अभिमानास्पद कामगिरी करत आपण दिवसेंदिवस नाव मिळवत आहोत. सरकारच्या मते मेड इन इंडिया हि मोहीम भारताच्या प्रगतीसाठी महत्वाची ठरणार आहे. आत्मनिर्भर होण्यासोबतच ह्या वस्तूंची विक्री करत आपल्या देशाची आर्थिक वाढ देखील यामुळे शक्य होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता सेमीकंडक्टर क्षेत्रात सुद्धा भारताने आपलं एक पाऊल पुढे टाकलं आहे. मायक्रोन टेक्नोलोजीकडून गुजरात येथे मेड इन इंडिया चिप तयार करण्याचे काम सुरु झालं असून लवकरच आपल्याला ही चिप दिसेल.

डिसेंबर 2024 मध्ये पहिल्यांदा भारत मेड इन इंडिया चीप (Made In India Chip)जगासमोर येणार आहे अशी माहिती शुक्रवारी आयटी क्षेत्राचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. येणाऱ्या काही दिवसांत देशात 4 ते 5 सेमीकंडक्टर (Semiconductor) च्या सुविधा तयार होऊ शकतात अशीही महिती त्यांच्याकडून सामोर आली आहे. यामुळे जागतिक पातळीवर आपण नाव गाजवू शकतो. या दिशेने पहिले पाउल म्हणजेच गुजरात मधील प्लांट म्हणावं लागेल. मायक्रोन टेक्नोलोजीस (Micron Technology) कडून हे काम सुरु होणार आहे तसेच या प्लांटची बांधणी टाटा प्रोजेक्ट करत आहेत.

भारतात सेमीकंडक्टर तयार करणारी मायक्रोन हि पहिलीच कंपनी असणार आहे. गुजरातमध्ये सुरु होणाऱ्या या प्लांटचे भूमी पूजन करण्यात आले आहे. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि राज्य मंत्री राजीव चंद्रशेखर हे सुद्धा उपस्थित होत. लवकरच इथे काम सुरु करण्यात येणार असून कर्मचाऱ्यांची सुद्धा निवड सुरु झाली आहे.

किती रुपयांची गुंतवणूक?

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून 2023 मध्ये अमेरिकेतील मायक्रोन कंपनीसोबत या बाबत चर्चा केली होती. आता भेटीच्या तीन महिन्यानंतर कंपनीकडून प्लांटवर काम सुरु झाले असून, भारताची सेमीकंडक्टर मिशन मधील हि सर्वात मोठी गुंतवणूक ठरणार आहे. याची एकूण रक्कम $2.75 बिलिअन एवढी मोठी असली तरीही यात केंद्र आणि राज्य सरकारांचा समावेश दिसतो. केंद्र सरकार कडून 50% तर राज्य सरकारने यात 20% गुंतवणूक केली आहे. प्लांट सुरु करण्याचा एकूण खर्च $825 मिलिअन पर्यंत जाऊ शकतो, ज्यात मायक्रोन कंपनी आणि भारत सरकार गुंतवणूक करतील. विशेष म्हणजे मायक्रोन कंपनी कडून प्लांटवर जवळपास 15,000 पेक्षा जास्ती नोकऱ्या निर्माण केल्या जातील अशी माहिती समोर आली आहे.