Medical Inflation : देशात वैद्यकीय महागाईचा आकडा वाढला; सर्वसामान्यांना फटका

Medical Inflation: आपण असं म्हणतो कि कामाच्या ओघात आपल्याला स्वतःकडे द्यायला वेळ मिळत नाही आणि म्हणूनच आपल्या शरीराची आणि आरोग्याची हेळसांड होत आहे. पण कदाचित आज आम्ही सांगितलेली बातमी ऐकून तुम्ही थक्क व्हाल कारण संपूर्ण आशिया खंडाच्या तुलनेत आपल्या देशात सर्वाधिक खर्च हा औषधांवर आणि वैद्यकीय चाचण्यांवर केला जात आहे. देशातील उत्पन्नाचा भलामोठा भाग आपण वैद्यकीय सेवांवर खर्च करतोय. आश्चर्य वाटलं ना? पण हि बातमी खरी आहे, त्यामुळे जाणून घेऊया का आणि अशी वाढली देशात वैद्यकीय महागाई..

देशात वैद्यकीय महागाई वाढली : (Medical Inflation)

जगभरात महागाईचं प्रमाण वाढलंय हि गोष्ट एव्हाना तुम्हाला समजलीच असेल. पण महागाईचे वेगवेगळे प्रकारही असतात यांची कल्पना फारच कमी लोकांना असते, आणि यातीलच एक महत्वाचा प्रकार म्हणजे वैद्यकीय महागाई. वैद्यकीय महागाईत औषधांवर आणि विविध तपासण्यांवर केलेला खर्च सामावला जातो आणि आपल्या देशात सध्या हाच खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.

Insurtech कंपनी Plum च्या ‘Health Report of Corporate India 2023’ नुसार, भारतातील वैद्यकीय महागाई दर 14 टक्क्यांवर पोहोचला आहे. आणि म्हणूनच सर्वसामान्य लोकांचा देश असलेल्या भारताला वैद्यकीय महागाईचा (Medical Inflation) सामना करावा लागतोय. कंपनीचा अहवाल म्हणतो की भारत देशातील 71 टक्के लोक वैद्यकीय खर्चावर स्वतःचे पैसे खर्च करतात आणि कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा प्रदान करणाऱ्या कंपन्या या फक्त 15 टक्केच आहेत.

या महागाईचा फटका देशातील 9 कोटींपेक्षा जास्ती लोकांना बसतोय, कारण त्यांच्या कमाई मधली 10 टक्क्यांपेक्षा जास्ती रक्कम हि केवळ वैद्यकीय गोष्टींवर खर्च होते. कंपनीमधून मिळणाऱ्या विमा सेवेची जागरूकता देखील नवीन आणि तरुण कर्मचारी वर्गापर्यंत पोहोचत नाही. देशात 59 टक्के लोकं अशी आहेत ज्यांची वार्षिक आरोग्य तपासणी देखील होत नाही. आपल्याकडे नोकरदार वर्गाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असली तरीही त्यांच्यापर्यंत अश्या सोयी आणि सुविधा पोहोचत नसल्याने मोठा धोका निर्माण होऊ शकतो.