Mukesh Ambani: भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजेच मुकेश अंबानी. अगदी कोरोना काळापासून ह्या सर्वात श्रीमंत माणसाने एक रुपयाही पगार म्हणून घेतलेला नाही. मग गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो तरी कसा? मुकेश अंबानी हे रिलायन्स कंपनीचे अध्यक्ष आहेत, आणि एवढ्या मोठ्या कंपनीच्या अध्यक्षपदी असणाऱ्या माणसाला मिळणाऱ्या पगाराची आपण कल्पना देखील करू शकत नाही. अंबानी कुटुंब यांची ओळख श्रीमंती किंवा श्रीमंत घराणं म्हणून केली जाते. पण मुकेश अंबानी जर का दिलेल्या सेवेबद्दल एक रुपयाही पगार म्हणून घेत नसतील तर एवढं भलं मोठं घर चालत तरी कसं असा प्रश्न अनेकांच्या मनात उत्पन्न झाला असेल.
मुकेश अंबानी घेत नाहीत पगार: (Mukesh Ambani)
रिलायन्स इंडस्ट्रीजची ख्याती केवळ देशात किंवा आशिया खंडातच नाही तर संपूर्ण जगभरात पसरलेली आहे. आणि या भल्या मोठ्या कंपनीचे अधिपत्य मुकेश अंबानी यांच्या हातात आहे. मुकेश अंबानी यांचा भव्य-दिव्य बंगला, त्यांचं राहणीमान आणि इतर गोष्टी लक्षात घेता बिनपगारी हा माणूस एवढ्या साम्राज्याचा भार नेमका पेलतो तरी कसा? कोरोना काळापासून म्हणजेच सलग तीन वर्षांपासून मुकेश अंबानी (Mukesh Ambani) त्यांनी कामाबद्दल कोणताही पगार घेत नाही किंवा कंपनीकडून कुठलेही अनुषंगिक लाभ घेतलेले नाहीत. कोविडच्या महामारीचा काळ हा खरोखर सर्वांसाठीच एका वाईट स्वप्नागत होता. या महामारीने अनेक निर्दोष आणि निष्पाप जीवांचा बळी घेतला आहे तसेच यामुळे देशाची अर्थव्यवस्था आणि व्यवसाय देखील कोलमडून पडण्याच्या मार्गावर होते. अशा परिस्थितीतच कंपनीच्या हितासाठी मुकेश अंबानी यांनी पगार न घेण्याचा निर्णय घेतला होता.
मुकेश अंबानी यांना किती पगार मिळायचा?
रिलायन्स इंडस्ट्रीजची ख्याती बघता अध्यक्षपद सांभाळणाऱ्या माणसाला किती पगार मिळत असेल याची कल्पना सामान्य माणूस करू शकत नाही. वर्ष 1977 मध्ये मुकेश अंबानी यांची रिलायन्स संचालकीय मंडळात नियुक्ती करण्यात आली होती, तर वर्ष 2002 मध्ये धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. वर्ष 2008 ते 2020 ह्या मोठ्या कालखंडात मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना प्रति वर्ष 15 कोटी रुपयांचा पगार मिळत होता, मात्र कोरोनाचा संसर्ग आणि अर्थव्यवस्था लक्षात घेत त्यांनी मागच्या तीन वर्षात म्हणजेच 2020 ते 2023 पर्यंत कंपनीकडून कोणताही पगार घेतलेला नाही. एवढेच नाही तर पुढील पाच वर्ष ते कंपनीकडून कोणताही पगार घेणार नाही अशी माहिती त्यांनी स्वतः दिली आहे.
मग अंबानींचा खर्च कसा भागतो?
मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे काही आपल्या प्रमाणे सर्वसामान्य माणूस नाही. कंपनीकडून पगार न घेता देखील त्यांना सर्व प्रकारचे भत्ते, सेवानिवृत्तीचा लाभ, कमिशन स्टॉक, ऑपरेशनचे लाभ आणि अनुषंगिक भत्ते असे अनेक लाभ मिळतात. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 9390 अब्ज डॉलर्स इतकी असून जगातील अब्जाधिशांच्या यादीत ते 13 व्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष गेल्या काही वर्षांपासून बिनपगारी जरी असले तरी कंपनी वेळोवेळी त्यांना जाहीर झालेला लाभांश देत असते. रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मुकेश अंबानी हे सर्वात मोठे शेअर होल्डर असून त्यांच्या काही वैयक्तिक गुंतवणूका देखील आहेत तसेच आयपीएल मध्ये ते मुंबई इंडियन्सच्याद्वारे भरपूर कमाई करतात.