Mutual Fund SIP : बाजारात आता गुंतवणुकीचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत, ज्यांपैकी अनेकांच्या पसंतीस उतरलेला म्हणजेच म्युचअल फंडस्. तुम्हाला अनेकांनी म्युचअल फंड्सच्या SIP मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला असेल. मात्र गुंतवणूक प्रकार कुठलाही असला तरीही त्याबद्दल व्यवस्थित आणि सविस्तर माहिती असली पाहिजे. समाजात फसवणुकीचं प्रमाण वाढत आहे, आणि अश्यात तुम्ही डोळे बंद करून कुणावरही विश्वास ठेऊ शकत नाही. त्यामुळे जाणून घेऊया की SIP म्हणजे काय आहे, आणि म्युचअल फंड्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी SIP चे किती पर्याय उपलब्ध आहेत.
SIP म्हणजे सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (Systematic Investment Plan), आणि नियोजनपूर्वक गुंतवणुकीसाठी याचा सर्वाधिक वापर केला जातो. म्हणूनच अनेक तज्ञ म्युचअल फंड्स मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. या अंतर्गत दर महिन्याला तुम्ही एका ठराविक रकमेची गुंतवणूक करीत असता. सर्व सामान्यपणे SIP गुंतवणुकीचे 2 प्रकार सर्वांच्या परिचयाचे आहेत. मात्र खरं तर SIP मध्ये पाच वेगवेगळ्या प्रकारे गुंतवणूक करता येते.
SIP गुंतवणुकीचे प्रकार कोणते? (Mutual Fund SIP)
१) नियमित SIP: नावाप्रमाणेच इथे तुम्हाला एका नियमित कालावधीसाठी ठराविक रकमेची गुंतवणूक करावी लागते. गुंतवणुकीची रक्कम निवडण्याचे स्वातंत्र्य गुंतवणूकदाराच्या हाती असते, आणि हि गुंतवणूक दर महिन्याला, तीन महिन्यांनी किंवा सहा महिन्यांनी करता येते.
२) स्टेप-अप SIP: स्टेप अप म्हणजे गुंतवणुकीत वाढ, या गुंतवणूक प्रकारामध्ये तुम्ही एका ठराविक वेळेनंतर गुंतवणूक वाढवू शकता. तुम्ही करत असलेल्या गुंतवणूक प्रकारानुसार इथे पाच, किंवा दहा टक्क्यांची वाढ करता येते.
३) लवचिक SIP: लवचिक गुंतवणूक म्हणजे जिथे केलेल्या गुंतवणुकीमध्ये बदल करणे शक्य आहे. गुंतवणूकदाराच्या आवश्यकतेनुसार इथे गुंतवणूक वाढवली जाऊ शकते तसेच गुंतवणूक कमी देखील करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र याबद्दल सविस्तर माहिती फंड हाऊसला पोहोचवली पाहिजे, ती सुद्धा हप्ता कापला जाण्याआधी.
४) ट्रिगर SIP: इथे गुंतवणूकदार वेळ आणि मूल्यमापनाच्या आधारे योजना तयार करू शकतात. अनेकांच्या मते NV 1000 रुपयांपेक्षा जास्त असेल तेव्हा ट्रिगर SIP सुरू करावा असा सल्ला दिला जातो. तो 1000 रुपायांपेक्षा कमी असल्यास, SIP मध्ये अतिरिक्त पैसे गुंतवा अशी अट लागू केली जाऊ शकते (Mutual Fund SIP).
५) विम्यासह SIP: SIP गुंतवणुकीमध्ये तुम्ही विम्याचा लाभ देखील मिळवू शकता, मात्र विम्याचे पॅकेज हे फंड हाऊस नुसार बदलू शकते याची जाणीव असुद्या. या प्रकारच्या SIP गुंतवणुकीमध्ये SIP रकमेच्या दहापट कव्हर मिळवणे शक्य आहे, मात्र लक्ष्यात घ्या हा फायदा केवळ इक्विटी म्युचअल फंड्सवर दिला जातो.