Narayan Murthy: प्रसिद्ध IT कंपनी Infosys याबद्दल आपण सर्वच जण जाणतो. Infosysचे मालक नारायण मूर्ती यांनी कंपनीच्या सुरुवातीच्या काळात अपार मेहनत घेऊन आज एवढे मोठे साम्राज्य उभे केले आहे. मूर्ती यांनी देशातील तरुणांना देखील स्वतःचे उदाहरण देत आठवड्याला किमान 70 तास काम करा असे आवेदन केले होते. कंपनी प्राथमिक टप्प्यात असताना अहोरात्र काम करणाऱ्या नारायण मूर्तींनी Infosys ची सुरुवात कशी केली असेल याबद्दल कधी विचार केला आहे का? Infosys ची सुरुवात करण्याआधी मूर्ती यांचे जीवन कसे होते व त्यांनी भारतातील दुसऱ्या सर्वात मोठ्या IT कंपनीची सुरुवात का केली हे आज जाणून घेऊया…
कशी झाली Infosys ची सुरुवात? (Narayan Murthy)
वर्ष 1981 मध्ये नारायण मूर्ती यांनी आपल्या बाकी सहा कर्मचाऱ्यांसोबत नवीन कंपनी उभारण्याची योजना केली. यावेळी मूर्ती दाम्पत्याकडे काही भरपूर पैसे नव्हते, त्याकाळी मूर्ती परिवार एका खोलीच्या घरात राहायचा आणि सुधा मूर्ती यांच्याकडून 10 हजार रुपये उसने घेऊन नारायण मूर्ती यांनी Infosys ची सुरुवात केली होती. मात्र Infosys कंपनी सुरुवात करण्यामागे सर्वात मोठे कारण काय आहे तुम्ही जाणता का? ते आहेत अजीज प्रेमजी.
Infosys सुरू करण्यासाठी प्रेमजी जबाबदार का?
Infosys चे मालक नारायण मूर्ती यांनी स्वतः कंपनीच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल उलगडून सांगताना देशातील आणखीन एका प्रसिद्ध IT कंपनीचा उल्लेख केला होता, Wipro आणि त्या कंपनीचे मालक अजीज प्रेमजी यांच्याबद्दल बोलताना नारायण मूर्ती म्हणतात की काही वर्षांपूर्वी जेव्हा ते(Narayan Murthy) नोकरीच्या शोधात होते तेव्हा त्यांनी Wipro मध्ये नोकरीसाठी अर्ज केला होता, मात्र कंपनीने त्यांचा अर्ज अस्वीकार करत नारायण मूर्तींना नोकरी देऊ केली नव्हती.
लक्षात घ्या की नारायण मूर्ती यांचा प्रवास इथूनच सुरू झालेला नाही. अगदी सुरुवातीच्या काळात त्यांनी IIM अहमदाबाद इथे Research Associate म्हणून नोकरी केली होती. तसेच Infosys ही कंपनी त्यांनी सुरु केलेला एकमेव व्यवसाय नाही. काही काळ आधी नारायण मूर्ती यांनी सॉफ्टट्रानिक्स(Softronix) या कंपनीची स्थापना केली होती, पण ही कंपनी मनाजोगे यश संपादन करू शकली नाही म्हणून मूर्तींना हा व्यवसाय बंद करावा लागला होता. त्यानंतर नारायण मूर्ती यांनी पुण्यात पटानी कंप्युटर सिस्टम्स मध्ये नोकरी करायला सुरुवात केली आणि दरम्यान Wipro मध्ये नोकरीसाठी अर्ज केला. त्याकाळात नारायण मूर्ती यांचा अर्ज पूर्णपणे अस्विकार करण्यात आला होता आणि परिणामी आज Infosys ची सुरुवात झालेली पाहायला मिळते. आज अजीज प्रेमजी सुद्धा नारायण मूर्ती यांना नोकरी न देणं ही त्यांची सर्वात मोठी चूक मानतात, जर जुन्या काळात त्यांनी नारायण मूर्ती यांना नोकरीवर ठेवलं असतं तर आज IT क्षेत्राचं संपूर्ण चित्र पलटून गेलेलं पाहायला मिळालं असतं.