Narayana Murthy : इन्फोसिसचे मालक नारायण मूर्ती हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. तरुण पिढीने त्यांच्या संपूर्ण क्षमतेपर्यंत कामांमध्ये स्वतःला झोकून दिल्याने भारत प्रगती करू शकतो असे त्यांचे म्हणणे आहे. नारायण मूर्ती यांच्या अशाच स्पष्ट आणि रोखठोक विधानामुळेच काही लोकं त्यांच्या बाजूने तसेच विरोधात बोलताना दिसतात. आज मात्र नारायण मूर्ती यांनी एक वेगळेच माहिती माध्यमांसोबत शेअर केली. ते म्हणाले की, “सुधा मूर्ती यांना कंपनीच्या बाहेर ठेवून मी चूक केली”. कंपनीचे बाकी सह संस्थापक आणि स्वतः नारायण मूर्ती यांच्या पेक्षाही सुधा मूर्ती म्हणजे त्यांच्या पत्नी या अधिक पात्र होत्या, मात्र मूर्ती हे चुकीच्या आदर्शवादाला कवटाळून बसल्याची कबुली त्यांनी माध्यमांसोबत दिली. नारायण मूर्ती यांनी अचानक सुधा मूर्ती यांच्या बद्दल हा विशेष खुलासा केल्यामुळे अनेक जणांच्या भुवया उंचावल्या आहेत. सुधा मूर्ती या इंजिनियर आहेतच पण सोबतच त्या उत्तम लेखिका म्हणून अनेकांच्या मनात राज्य करतायेत. मात्र नारायण मूर्ती यांनी पत्नी संबंधात असे अचानक वक्तव्य का केले हे जाणून घेऊया….
सुधा मूर्तींबद्दल नारायण मूर्तींचे खास वक्तव्य: (Narayana Murthy)
सुधा मूर्ती यांना कंपनीच्या बाहेर ठेवून मी चूक केली अशी कबुली इन्फोसिस संस्थापक नारायण मूर्ती यांनी दिली. “इन्फोसिसचे सह संस्थापक आणि माझ्याशिवाय सुधा मूर्ती या अधिक पात्र होत्या, मात्र मी चुकीचा आदर्शवादाला कवटाळून बसलो होतो” अशी कबुली स्वतः नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांनी माध्यमांना दिली आहे. स्वतःच्या उद्योगांमध्ये कुटुंबीयांनी सहभागी करून घेऊ नये अशा प्रकारची विचारसरणी बाळगण्याने त्यांनी चुकीचा निर्णय घेतला असे त्यांचे म्हणणे आहे. नारायण मूर्ती म्हणतात की स्वतःच्या कुटुंबीयांचा व्यवसायातील हस्तक्षेप टाळणे म्हणजेच एक उत्तम कॉर्पोरेट व्यवस्था आहे असे त्यांचे मत होते.
जुन्या काळात अनेक उद्योगपतींची मुलं देखील व्यवसायात लक्ष घालीत होते व त्यामुळे कंपनीच्या काही नियमांचा भंग होत होता. नारायण मूर्तींना सदर प्रकार इन्फोसिस सोबत घडलेला नको असल्याने त्यांनी सुधा मूर्तींना कायमस्वरूपी इन्फोसिस पासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता मात्र त्यांची ती विचारसरणी पूर्णपणे चुकीची असल्याचा दावा त्यांनी केला व कुठलाही माणूस त्याच्या व्यवसायात पत्नी आणि मुलांना सहभागी नक्कीच करून घेऊ शकतो असे मत परिवर्तन झाल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. “आजूबाजूच्या वातावरणाचा मोठा प्रभाव झाल्याने मी सुधा मूर्ती यांना कंपनीपासून दूर ठेवून चूक केली” याची खंत त्यांच्या (Narayana Murthy) मनात आहे.
कोण आहेत Infosys चे पहिले गुंतवणूकदार?
आज देशात दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Infosys या कंपनीत सर्वात पहिली गुंतवणूक कोणी केली हे तुम्हाला माहित आहे का? इन्फोसिस कंपनीच्या सर्वात पहिल्या गुंतवणूकदार अजून कोणी नसून स्वतः सुधा मूर्ती याच होत्या. उत्तम लेखिका म्हणून कार्यरत असलेल्या सुधा मूर्ती यांनी कंपनी सुरू करण्यासाठी नारायण मूर्ती यांना दहा हजार रुपये दिले होते. सदर प्रकाराबद्दल सुधा मूर्ती म्हणतात की त्यांना नेहमीच इन्फोसिस मध्ये काम करण्याची इच्छा होती. मात्र केवळ कुटुंबासाठी आपण माघार घेतल्याचे त्या कबूल करतात. “मेंदू या निर्णयाशी सहमत होता पण हृदय मात्र कधीच तयार नव्हते” अशी मनातली गोष्ट सुधा मूर्ती यांनी माध्यमांसमोर कबूल केली होती.