New Year Saving Plan: नवीन वर्षाची सुरुवात अगदी दमदारपणे झाली आहे. वर्ष 2023 च्या शेवटच्या काही महिन्यात आपल्या देशाची अर्थव्यवस्था बऱ्यापैकी सुधारली, त्यामुळे नवीन वर्षात देखील भारताच्या अर्थव्यवस्थेकडून अधिकाधिक सकारात्मक बातम्या ऐकायला मिळतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. नवीन वर्ष म्हटलं की आपण नवीन योजना बनवतो, जुन्या वर्षात जे टप्पे गाठायचे आहेत त्यांची यादी तयार करतो. मात्र या सर्व घडामोडींमध्ये आर्थिक बाजू तपासून पाहिली आहेत का? महागाईचा आकडा जगभरात दिवसेंदिवस वाढत चाललंय. अशा परिस्थितीत केवळ महिन्याला काहीशी रक्कम कमवून भागणार नाही, तर ती रक्कम व्यवस्थित साठवून, गुंतवता आली पाहिजे. याचा अर्थ मुळीच खर्च करायचा नाही असा होतो का? अजिबात नाही. पैसा स्वतःच्या कामी आला पाहिजे पण आपण खर्च करत असणारा पैसा हा योग्य नियोजनाद्वारे मार्गी लावल्यास त्यातून आर्थिक नुकसान होणार नाही. आज आम्ही तुम्हाला काही कल्पना सुचवणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्हाला संपत्ती वाढवण्यात मदत होईल. हातात पैसा टिकवायचा असेल आणि नेहमीच खिसा भरलेला राहावा असं वाटत असेल तर या वर्षी आर्थिक दृष्ट्या मजबूत बनण्यास स्वप्न पहा, मात्र यात सर्वात आधी तुम्हाला काही वाईट सवयींना कायमचा रामराम ठोकावा लागेल.
१) बचत न करणे:
भले आपण महिन्याला 40 ते 50 हजार रुपयांची कमाई करत असू, पण जर का तुमचा खर्च अधिक होत असेल तर हातातले पैसे क्षणार्धात संपून जातील आणि परिणामी तुम्ही काहीही बचत करू शकणार नाही. ही सवय फार जीवघेणी ठरू शकते त्यामुळे तिला वेळेतच बदला आणि येणाऱ्या समस्यांपासून दूर राहा. दर महिन्याला केलेल्या कमाईतून 50:30:20 या सूत्राचे पालन करता आले पाहिजे ज्यामध्ये 20% रकमेची कायम बचतच केली पाहिजे.
२) पैशांची गुंतवणूक न करणे:
दर महिन्याला काही प्रमाणात पैसे गुंतवले पाहिजेत, कारण बचत केलेला पैसा हा घरी किंवा बँक खात्यात पडून राहतो आणि अनावधानाने तो खर्च होतो. प्रत्येक सामान्य माणसाची हीच सवय आहे, त्यामुळे त्वरित या सवयीला रामराम करा. बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत जिथे तुम्ही कमीत कमी पैश्यांच्या गुंतवणुकीपासून सुरुवात करू शकता. पैसा गुंतवल्याने त्यामधून येणाऱ्या काळात चांगला परतावा मिळवला जाऊ शकतो(New Year Saving Plan). यामुळे पैसा द्विगुणीत होण्यास मदत होते.
३) आरोग्य विमा न घेणे: New Year Saving Plan
मागच्या दोन वर्षात आपण कोरोना महामारी सारख्या भीषण आजाराचा सामना केला. अशी वाईट आणि गंभीर परिस्थिती काही आपल्यावर सांगून चालून येणारे नसते. आणि कष्ट करून कमावलेला पैसा जर का आरोग्याच्या बाबतीतच कामी येणार नसेल तर त्याचा फायदा तरी काय? त्यामुळे यावर्षी आरोग्य विमा घेणे हे तुमच्या यादीत सर्वात पहिली नोंदवले गेले पाहिजे. आरोग्य विमा घेतल्याने बचतीचे पैसे खर्च होत नाहीत.
४) अनावश्यक खर्च करणे:
अनेक वेळा आपण गरज आणि अनावश्यक खर्च यात फरक करू शकत नाही. आधी आपली गरज ओळखून पैसा तिथे वापरला गेला पाहिजे. महागड्या वस्तूंची खरेदी, प्रवास यांसाठी घेतलेले कर्ज हा अनावश्यक खर्च आहे जो की येणाऱ्या काळात तुमच्यासाठी डोकेदुखी बनू शकतो. श्रीमंत असणे आणि इतरांसमोर श्रीमंतीचा देखावा करणे यात मोठा फरक आहे. मोठमोठ्याला पार्ट्या, धुम्रपान, दारू, ऑनलाइन गेम, ब्रांडेड शॉपिंग यांसारख्या गोष्टींवर होणारा खर्च वाचवा (New Year Saving Plan) भविष्यात तुम्हाला पश्चाताप करावा लागणार नाही.