Nike Layoffs: जगभरात प्रसिद्ध असलेली Sportswear कंपनी Nike हिने विक्रीतील घट आणि वाढत्या स्पर्धेमुळे 2 टक्के कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, यामुळे अनेक कर्मचारी नोकरी गमवाण्याच्या धोक्याच्या पिंजऱ्यात अडकलेत. जगभरात आर्थिक मंदीचे प्रमाण वाढत असताना अनेक मोठं मोठाल्या कंपन्या कर्मचाऱ्यांना बाहेर जाण्यासाठी प्रवृत्त करीत आहेत. गेल्या वर्षभरात एक ना अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना काढून टाकलं होतंच, पण यंदाही या चित्रात काही बदल झालेला दिसत नाही.
Nike चा कर्मचाऱ्यांना कायमचा रामराम? (Nike Layoffs)
जगप्रसिद्ध Sportswear कंपनी Nike ने गेल्या वर्षीही खर्च कमी करण्याच्या उद्देशाने जगभरातील अनेक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले होते. कंपनीच्या म्हणण्यानुसार या कपातीमुळे सुमारे 1,600 कर्मचाऱ्यांवर परिणाम झाला होता. हे कर्मचारी Nike च्या विविध विभागांमध्ये आणि जगभरातील विविध ठिकाणी कार्यरत होते. आता पुन्हा एकदा या कंपनीत काम करणाऱ्या लोकांच्या डोक्यावर कपातीची तलवार ठेवण्यात आलीये, या कपातीमुळे Nike कंपनीवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. लागोपाठ कपातीमुळे कर्मचाऱ्यांच्या मनोबलावर परिणाम होण्यासोबतच, कंपनीची कार्यक्षमता आणि उत्पादकताही कमी होऊ शकते.
अहवालानुसार कंपनी दुकाने आणि वितरण विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कपात करणार नाही. मात्र, यावेळी Innovation विभागातील कर्मचाऱ्यांवर कपात होण्याची शक्यता आहे. 31 मे 2023 पर्यंत कंपनीकडे जागतिक स्तरावर सुमारे 83,700 कर्मचारी होते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, मागील वर्षाच्या तुलनेत 30 नोव्हेंबरपर्यंत विक्रीत फक्त 1 टक्का वाढ झाली आहे(Nike Layoffs). सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या उत्तर अमेरिकेत कंपनीची विक्री 5 टक्क्यांनी घसरली आहे आणि मंदीच्या भीतीमुळेच जागतिक स्तरावर अनेक कंपन्या खर्चात कपात करत आहेत.