Nikesh Arora Success Story : एकेकाळी बर्गरच्या दुकानात केलं काम, आज आहेत अब्जाधीश; निकेश अरोरा यांचा प्रेरणादायी प्रवास

Nikesh Arora Success Story: तुम्ही कधी भारतीय वंशाचे अमेरिकन उद्योगपती निकेश अरोरा यांचं नाव ऐकलं आहेत का? सध्या ब्लूमबर्गच्या अब्जाधीशांच्या यादीत त्यांचं नाव सामावल्यामुळे निकेश अरोरा चर्चेचा विषय बनले आहेत. अमेरिकेत आताच्या घडीला अब्जाधीश बनलेल्या या भारतीयाने सुरुवातीच्या काळात अनेक कष्ट तसेच मेहनत घेतली होती. आम्ही नेहमीच उद्योग क्षेत्रातील विविध नावाजलेल्या आणि मेहनतीच्या जोरावर पुढे आलेल्या लोकांबद्दल माहिती पुरवत असतो. आपल्या आजूबाजूला वावरणारी ही सामान्य लोक, त्यांच्या असामान्य कामासाठी ओळखली जातात. परिस्थिती ही सर्वांसाठीच एक समान असली तरीही त्याला आपण कशाप्रकारे तोंड देतोय हे सर्वात महत्त्वाचा भाग आहे. अनेक वेळा कठीण परिस्थितीचा सामना करू न शकल्याने आपण हार मानतो आणि मागे सरतो, मात्र असे न करता जो कायमस्वरूपी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला पोहत टिकून राहतो, तोच जगासमोर वेगळं उदाहरण घडवू शकतो. निकेश अरोरा हे देखील याप्रमाणेच एक आहेत. कुठलीही कंपनी सुरू न करता अमेरिकेत अब्जाधीश बनलेले निकेश अरोरा यांची एकूण गोष्ट तरी काय हे आज जाणून घेऊया….

निकेश अरोरांबद्दल काय सांगतो ब्लूमबर्गचा अहवाल? (Nikesh Arora Success Story)

ब्लूमबर्गच्या बिलिनिअर इंडेक्सच्या अनुसार निकेश अरोरा यांची आत्ताच्या घडीला एकूण संपत्ती 1.5 अब्ज डॉलर्स पेक्षा अधिक आहे. याची भारतीय चलनात रूपांतरण करायचे झाल्यास त्यांचे एकूण मालमत्ता ही 12,495 कोटी रुपये आहे. हा करोडपती माणूस सध्या अमेरिकेत पावलो अल्टो नेटवर्क या कंपनीचे सीईओ आणि अध्यक्षपद सांभाळत असून अमेरिकेतील नावाजलेली ही कंपनीचे मार्केट कॅप जवळपास 91 अब्ज डॉलर्सच्या आसपास आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेत कार्यरत असलेल्या निकेश अरोरा यांना गुगलमध्ये देखील कामाचा अनुभव आहे.

अमेरिकेत राहणाऱ्या या अब्जाधीशाचा जन्म मात्र भारतीय आहे:

आज अमेरिकेत अब्जाधीश म्हणून नाव कमावलेल्या निकेश अरोरा यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1968 रोजी उत्तर प्रदेश मधल्या गाजियाबाद येथे झाला. एअरफोर्सच्या शाळेतून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी IIT BHU मधून इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग शिक्षण घेतलं आणि त्यानंतर शिक्षणात अधिक भर पाडण्यासाठी ते अमेरिकेत निघून गेले. अमेरिकेत त्यांनी नॉर्थ ईस्ट युनिव्हर्सिटी मधून MBA आणि बोस्टन कॉलेज मधून फायनान्स मध्ये MSची पदवी मिळवली होती.

अमेरिकेत गेलेल्या निकेश अरोरा यांनी इथून पुन्हा मागे वळून पाहिलं नाही आपल्या करिअरच्या सुरुवात त्यांनी फेडीलिटी इन्व्हेस्टमेंट मधून केली होती, इथे त्यांनी टेक्निकल मॅनेजमेंट अँड फायनान्सच्या संदर्भात जबाबदारी सांभाळली. आपल्या इथपर्यंतच्या प्रवासाबद्दल बोलताना ते म्हणतात की “अमेरिकेत पहिल्यांदा पाऊल ठेवताना वडिलांनी त्यांना 75 हजार रुपये दिले होते(Nikesh Arora Success Story). मात्र खर्च अधिक असल्यामुळे हा खर्च भागवण्यासाठी त्यांनी विविध ठिकाणी काम केलं.” कधी बर्गरच्या दुकानात तर कधीच सेक्युरिटी गार्ड म्हणून देखील आपण काम केल्याचं ते सांगतात.

आज आहेत कैक अब्ज डॉलर्सचे मालक:

कदाचित जो माणूस नेहमी प्रयत्नशील राहतो आणि परिस्थिती समोर झुकत नाही, यश त्याच्याच दारी जाण्याचा निर्णय घेतं. निकेश अरोरा यांच्या बाबतीत देखील हेच सत्य आहे केवळ मेहनतीच्या जोरावर त्यांनी आतापर्यंत एवढी मजल गाठली. गुगल ही जगभरात एक नावाजलेली कंपनी म्हणून ओळखले जाते, अनेक तरुणांच्या मनात गुगलमध्ये नोकरी मिळवणं हे जाणू एक स्वप्न असतं. निकेश अरोरा हे स्वप्न जगलेच नाही तर गुगल मधून सर्वात जास्त पगार घेणारे कर्मचारी म्हणून ते ओळखले जातात (Nikesh Arora Success Story). अरोरा यांनी वर्ष 2018 मध्ये पावलो अल्टो नेटवर्क्स मध्ये नोकरी स्वीकारली आणि आता ते कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष म्हणून इथे जबाबदारी सांभाळत आहेत. कंपनीत रुजू होताना त्यांना 125 दशलक्ष डॉलर्स किमतीचे शेअर्स देण्यात आले होते आणि आता या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे त्यांच्या वैयक्तिक संपत्ती मध्ये देखील 1.5 अब्ज डॉलर्सची वाढ दिसून आली आहे.