Odisha Raid Update : जप्त केलेला काळा पैसा नेमका जातो तरी कुठे?

Odisha Raid Update: आपला देश आर्थिक दृष्ट्या तेजीने प्रगती करत असला तरीही ही वाढ रोखणारा शत्रू आहेच. आणि हा शत्रू कोणी स्पर्धा करणारा देश नसून स्वतः आपणच आहोत. देशांतर्गत वाढणारं भ्रष्टाचाराचं प्रमाण अद्याप काही कमी होण्याचं नाव घेत नाही. भ्रष्टाचार ही आपल्या देशाला लागलेली अशी एक कीड आहे जी अगदीच मुळापासून आपल्याला पोखरून टाकू शकते. भारतात अगदी छोट्यातल्या छोट्या कार्यालयापासून ते मोठमोठाल्या मंत्र्यांच्या कार्यालयांपर्यंत भ्रष्टाचाराची हीच कीड वावरताना पाहायला मिळते. केवळ स्वतःचा उत्कर्ष साधू पाहणाऱ्या या आत्मकेंद्रीत माणसांच्या वृत्तीमुळेच देशाचे आर्थिक नुकसान होत आहे. अलीकडेच आयकार विभागाकडून ओडिसा येथे काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या कामकाजावर छापा टाकण्यात आला होता, इथून हस्तगत करण्यात आलेल्या रकमेची मोजणी 6 डिसेंबर पासून सुरू झाली होती. पैशांची मोजणी करून मशीन देखील थकून जाईल एवढा बाजारातून लुटलेला हा काळा पैसा नेमका जाईल तरी कुठे हे जाणून घेऊया….

हस्तगत केला गेलेला काळा पैसा जातो तरी कुठे (Odisha Raid Update)?

काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या मालमत्तेवर आयकर विभागाकडून धाड टाकण्यात आली होती, ज्यामधून आत्तापर्यंत एकूण 351 कोटी रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. पैसे मोजता मोजता मशीन देखील आता घाम काढू लागलंय असे विनोदी वक्तव्य अनेकजणं करतायत.आत्तापर्यंत जप्त करण्यात आलेल्या विविध काळ्या रकमांमध्ये धीरज साहू यांच्या जवळून मिळालेली रक्कम सर्वाधिक होती असं म्हटलं जातंय. कुठल्याही यंत्रणे कडून कारवाईच्या दरम्यान जप्त करण्यात आलेली रक्कम ही नेमकी कुठे जाते हे आज जाणून घेऊया (Odisha Raid Update).

धीरज साहू यांच्या बाबतीत तज्ञांच्या मते जप्त करण्यात आलेल्या रकमेमधली 60 टक्के रक्कम कापून उरलेली रक्कम कदाचित यांना परत केली जाईल. त्यासाठी हा पैसा कर भरून मिळवलेला आहे हे त्यांना सिद्ध करावे लागेल. आपली बाजू मांडण्यासाठी धीरज सांगू यांना काही दिवसांची मुदत देखील दिली जाणार आहे. जर का कमवलेली रोख रक्कम आणि दागिने हे व्यवसायातूनच मिळवलेले आहेत हे साहू सिद्ध करू शकले नाहीत, तर त्यांच्यावर फौजदारी कलमाखाली गुन्हा दाखल केला जाऊ शकतो तसेच जप्त केलेली रक्कम त्यांना पुन्हा मिळणार नाही.

सध्या धीरज साहू यांच्याकडून जप्त करण्यात आलेली रक्कम बँकच्या सेफ कस्टडीमध्ये ठेवण्यात आली आहे (Odisha Raid Update). आता आयकर विभागाकडून जप्त करण्यात आलेल्या रकमेच्या बाबतीत जोडलेल्या सर्व माणसांना एक नोटीस पाठवली जाईल आणि त्यानंतर रोख रक्कम आणि इतर संपत्तीचं विवरण होईल. मात्र ही रक्कम कुठून मिळवली आहे याचा चोख पुरावा जोपर्यंत आयकर विभागाला मिळत नाही तोपर्यंत ही रक्कम विभागाजवळच सुरक्षित राहील.