बिझनेसनामा । भारतात गेल्या काही वर्षांमध्ये अनेक स्टार्टअप झाले आहेत. या स्टार्टअप्सने आपले चांगलेच बस्तान बसवले आहे. यातच Ola Cabs या कंपनीचा देखील समावेश होतो. आज आपण भारतातील सर्वात लोकप्रिय कॅब एग्रीगेटर आणि राइडशेअरिंग कंपनी असलेल्या Ola Cabs चे सह-संस्थापक भाविश अग्रवाल यांच्या प्रवासाविषयीची माहिती जाणून घेउयात.
पंजाबमधील लुधियाना येथे 28 ऑगस्ट 1985 रोजी भाविश अग्रवाल यांचा जन्म झाला. 2008 साली त्यांनी IIT बॉम्बे मधून कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमधली पदवी मिळविली. भाविश याना स्क्वॅश खेळायला आणि सायकलिंग करायला खूप आवडते. तसेच त्याचा एक फोटोग्राफी ब्लॉग देखील आहे.
2008 मध्ये अग्रवाल यांनी Desitech.in नावाने ब्लॉगर म्हणून स्वतःचा ब्लॉग सुरू केला. या ब्लॉगमधून ते भारतीय स्टार्टअप्स, टेक गीक गोष्टी, इव्हेंट इत्यादींबद्दलची माहिती द्यायचे. त्यांनी मायक्रोसॉफ्ट रिसर्च इंडियामध्ये रिसर्च इंटर्न म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. मायक्रोसॉफ्टमध्ये त्यांनी दोन वर्षे काम देखील केले.
पुढे जाऊन अग्रवाल यांनी ऑनलाइन कॅब सर्व्हिस सुरु करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट रिसर्च इंडियामधील आपली चांगल्या पगाराची नोकरी सोडून दिली. 2010 मध्ये भावीश यांनी अंकित भाटीसोबत बंगळुरूमध्ये “OLA CABS” ची स्थापना केली. ज्याची अधिकृतपणे मालकी ANI Technologies Pvt Ltd कडे होती.
इतर कोणत्याही ऑनलाइन मार्केटप्लेसप्रमाणेच OlaCabs हे खास कॅब एग्रीगेटर, राइडशेअरिंग आणि टॅक्सी सर्व्हिस देण्यासाठी सुरु करण्यात आले. याला OLA या नावाने जास्त ओळखले जाते. यानंतर अग्रवाल यांनी मुंबईमध्ये ऑनलाइन कॅब एग्रीगेटर म्हणून सुरुवात केली. जो भारतातील सर्वात वेगाने वाढणारा व्यवसाय म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.