Old jewellery Exchange : जुने दागिने विकून नवीन सोन्याची खरेदी करताय? पण याची खरी प्रक्रिया माहिती आहे का?

Old jewellery Exchange : मागच्या लग्न हंगामातच आपण सोन्या चांदीची खरेदी कशी करावी याचा आढावा घेतला होता. सोनं हा धातू बाजारातील अनेक मौल्यवान वस्तूंपैकी एक आहे, आणि म्हणूनच काटकसर करून पैसे जमा करत सोन्याची खरेदी केली जाते. घरात एखादं लग्न कार्य होणार असेल तर खास करून मुलीचे आई वडील सोन्याची जमवाजमव करण्यासाठी पैश्यांची गुंतवणूक सुरु करतात. असं म्हणतात कि सोनं हा सर्वाधिक मागणी असलेला धातू असून, आपल्या देशात याला सर्वाधिक मागणी आहे. सोन्याची वाढती मागणी पूर्ण करतानाच आपल्या अर्थव्यवस्थेला फटका बसतोय असेही अनेक तज्ञांचे मत आहे. सोन्याची खरेदी करताना अनेकदा तुम्ही जुने सोन्याचे दागिने सराफाला परत दिलेले पहिले असतील. पण तुम्हाला माहिती आहे का असे करताना देखील काही गोष्टी सतत लक्ष्यात ठेऊन हे देवाण घेवाणीचे काम केले पाहिजे. बाजारात कोणीही यावर विशेष असा प्रकाश टाकत नसलं तरीही आज आम्ही तुम्हाला जुने दागिने परत देऊन नवीन सोन्याची खरेदी करताना कायम लक्षात असाव्यात अश्या काही टिप्स देणार आहोत, म्हणून हि बातमी शेवटपर्यंत नक्कीच वाचा…

सोन्याचे दागिने परत करून नवीन विक्री करताय?

दिवस कितीही पुढे गेले आणि जग कितीही आधुनिक झालं तरी सोन्याची मागणी आणि महत्व काही कमी होणार नाही. सोनं हा कायम सर्वाधिक मागणी असलेला धातू राहणार आहे. असं म्हणतात कि कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यात सोन्याची महत्वाची भूमिका असते. भारतात महिला खास करून सोन्याच्या खरेदीकडे वळतात, आपल्याकडे सोन्याची परंपरा आणि वापर हा अगदी पौराणिक काळापासून चालत आलाय. पण या नवीन जगात लोकं गुंतवणूक म्हणून देखील सोन्याची खरेदी करताना दिसतात. सोन्याला मिळणारी मागणी यांमुळे दिवसेंदिवस सोन्याच्या किमतींमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. बाजारातील तज्ञांच्या मते गेल्या पाच वर्षात सोन्याच्या किमतींमध्ये 90 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ नोंदवण्यात आली आहे. वर्ष 2018 मध्ये 10 ग्राम 24 कॅरेट सोन्याची विक्री हि 30,850 रुपयांत केली जायची. आणि आता यात तूफानीची वाढ नोंदवण्यात आली असून 2023 मध्ये डिसेंबर महिन्यात 10 ग्राम सोन्याची किंमत 62,000 पेक्षाही अधिक आहे.

सोन्याचे जुने किंवा खराब झालेले दागिने जर का तुम्हाला परत करून नवीन दागिन्यांची खरेदी करायची असेल तर सर्वात आधी एका विश्वासू सराफाची निवड करा(Old jewellery Exchange). विश्वासू सराफ का? तर असे केल्यास फसवणुकीचा धोका कमी असतो. तसेच त्यांच्याजवळ तुम्हाला एक्सचेंजवर लागू होणाऱ्या किमती समजून घेऊन व्यवहार करता येईल, काही वेळा हा सराफ तुमच्या एकदम जवळचा असेल तर कदाचित तो सोन्याच्या खरेदीवर काही प्रमाणात सवलतही देऊ शकतो. जर का तुम्ही ऑनलाईन सोनं एक्सचेन्ज करणार असाल तर विश्वासू साईटची निवड करा.

जुने दागिने परत घेण्याची प्रक्रिया कशी असते? (Old jewellery Exchange)

तुमचा सोनार सर्वात अगोदर XRF या मशीनचा वापर करून सोन्याच्या शुद्धतेची पारख करेल. सोन्याचे वजन किती आहे त्यानुषंगाने तुम्हाला त्यांची किंमत सांगितली जाईल, आणि यानंतर तो जुना दागिना वितळवला जाईल. काही वेळा जर का तुम्ही खरेदी केलेल्या दुकानांमध्ये सोनं बदलून घ्यायला गेलात तर कदाचित सोनार ते वितळवणार नाही, मात्र काही सोनार सोनं वितळवून 25 ते 30 टक्के टक्कम रक्कम वेस्टेज चार्जीस म्हणून आकारू शकतात. लक्ष्यात असुद्या कि हॉलमार्क असलेले दागिने वितळवण्याची गरज नसते, कारण त्यांवर असलेला हॉलमार्क हेच त्यांच्या शुद्धतेचं प्रतीक आहे.

जुने दागिने वितळवून झाल्यानंतर पुन्हा एकदा ते सोनं XRF मशीनमध्ये ठेवलं जात आणि त्याची शुद्धता तपासली जाते. तीन वेळा रीडिंग मिळवल्यानंतर त्याची एव्हरेज व्हॅल्यू समोर आणली जाते आणि यानंतर पुन्हा सोनीचं वजन केलं जातं, आता नवीन वजन आणि शुद्धता लक्ष्यात घेत नवीन किंमत ठरवली जाते. ग्राहक जर का या नवीन किमतीवर सहमत असेल तर नवीन सोन्याच्या खरेदीमध्ये जुन्या सोन्याची किंमत सामावली जाते.