Online Fraud: आजच्या या जगात घरून काम करण्याची संकल्पना बऱ्याच अंगांनी रूढ होताना दिसते, विविध क्षेत्रांमध्ये आता Work From Home हाच पर्याय दिला जातोय. आणि घर बसल्या करता येणारे बाकी अनेक पर्याय देखील उपलब्ध आहेत, ज्यात सर्वाधिक इंटरनेटचा वापर करून पैसे कमावले जातात. कित्येक तरुण युट्युबचा वापर करून विविध प्रकारचे व्हिडीओ शेअर करतात आणि घर बसल्या पैसे मिळवतात. तुम्ही देखील यांमधले एक असाल तर जपून राहा, कारण इतर ठिकाणांप्रमाणे सोशल मीडिया आणि इंटरनेटचा वापर करून पैसे कमावताना चोर तुमची फसवणूक करू शकतात, आणि परिणामी तुम्हाला मोठ्या संकटाचा आणि नुकसानीचा सामना करावा लागू शकतो.
ऑनलाईन गुन्ह्यांमध्ये होतेय वाढ: (Online Fraud)
केंद्र सरकार वेळोवेळी आपल्याला फसवणुकींपासून सावध राहा असा इशारा देत असते. यासाठी विविध मोहीमा किंवा सोशल मीडियाचा वापर करून जागृती केली जाते. आत्तापर्यंत सरकार कडून अश्या अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्याचे काम केले आहे. खोटी ID वापरून ग्राहकांना लुबाडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कित्येक वेबसाईट्स कायमच्या बंद करण्यात आल्या आहेत. आत्ताच समोर आलेल्या माहितीनुसार अश्या अनेक खोट्या वेबसाईट्स विदेशातून चालवल्या जातात. विदेशात बसलेले सूत्रधार इथल्या निष्पाप आणि भाबड्या लोकांना लुटतात.
गुगल आणि मेटावरून होतेय फसवणूक:
गुगल हे सर्वपरिचित सर्च इंजिन आहे, त्यामुळे इथे जगभरातून अनेक लोकं त्यांचा कन्टेन्ट प्रकाशित करत असतात. पण लक्ष्यात घ्या कि सगळीच मंडळी काही भरोसा ठेवण्यासारखी नाहीत. देशात गुगुलचा वाढत वापर लक्ष्यात घेता आणि चोर आणि गुन्हेगारांनी या सुविधांचा गैरफायदा करून घ्यायला सुरुवात केली आहे (Online Fraud). अशी लोकं गुगलवर अनेक प्रकारच्या जाहिराती प्रदर्शित करतात, विशेष करून ज्यात तुम्हाला नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत असे आमिष दाखवले जाते. आणि गुगलचा वापर आपण गेल्या अनेक वर्षांपासून करत आलोय त्यामुळे सहाजिकच आपण अश्या जाळयात फसतो.
तुम्हाला नोकरी देण्याच्या नावाखाली ते तुम्हाला त्यांचे व्हिडियो Like, Share आणि Subscribe करायला लावतील ज्यासाठी ती फसवी कंपनी पैसे देखील देऊ करेल. एकदाका ते तुमचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी झाले कि हळू हळू ते तुम्हाला गुंतवणुकीचे मार्ग सुचवतील आणि परिणामी तुम्ही हातातली रक्कम गमावून बसाल. चार पाच दिवसांत संपणारा हा खेळ मुळीच नाही कारण इथे तुमच्या मनाशी थेट खेळी केली जाते, तुम्हाला विश्वास बसतो कि हि कंपनी तुमच्या केवळ आणि केवळ हिताचाच विचार करत आहे.
सरकारचे यावर म्हणणे काय?
सरकार वेळोवेळी आपल्या मदतीसाठी तत्पर असते तरीही आपण स्वतः काही जबाबदरी स्वीकारली पाहिजे. सावधगिरीचा सूचनांचे पालन केले पाहिजे. आतादेखील सरकारने अश्या फसव्या गुंतवणुकींपासून (Online Fraud) दूर राहण्याचा संदेश दिला आहे. फोन कॉल किंवा व्हॅटसएपच्या साहाय्याने जर का कोणी तुमच्यासाठी संपर्क साधत आर्थिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर अश्या व्यक्तीला ताबडतोब ब्लॉक करा, अश्या गुन्ह्यांना बळी पडल्यास त्वरित सरकारी कर्मचाऱ्यांना याची माहिती द्या. सध्या क्रिप्टोकरन्सी, विदेशी ATM आणि आंतराष्ट्रीय फिनटेक कंपन्यांच्या नावाखाली सामान्य जनतेला लुबाडण्याचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे जपून वावरा.