Pakistan Economy: पाकिस्तानची आर्थिक स्थिती बरोबर नाही हे आपण जाणतो. पाकिस्तान सरकारने देशाची आर्थिक परिस्थती पुन्हा पूर्ववत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे उधार देखील घेतले आहेत. आणि याला केवळ जबाबदार देशाची राजकीय परिस्थती आहे असे मत पाकिस्तानचे अर्थमंत्री शमशाद अहमद यांनी व्यक्त केले आहे. देशात अनेक दिवसांपासून राजकीय अस्थिरतेचे सावट कायम आहे, याचा परिणाम देशाच्या आर्थिक वाटचालीवर होत आहे, किंबहुना यामुळेच देश आर्थिक नुकसानीचा सामना करत आहे असंही ते म्हणालेत.
पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर काय म्हणतात अर्थमंत्री? (Pakistan Economy)
विकास परिषदेला संबोधित करताना पाकिस्तानचे अर्थमंत्री शमशाद अहमद म्हणाले कि, गेल्या दशकात पायाभूत सुविधांमध्ये विलंब झाला तसेच देशाने मोठ्या आर्थिक धक्क्यांचा आणि खटल्यांचा सामना केला, यामुळे सुधारणा करण्यासाठी एकूणच परिस्थिती कठीण झाली आहे. आंतरराष्ट्रीय वस्तूंच्या किमतीत होणारी वाढ आणि जगभरात वाढणारी महागाई यामुळे पाकिस्तानची परिस्थिती कमकुवत बनत चालली आहे आणि पाकिस्तान जवळपास आंतरराष्ट्रीय बाजारातून बाहेर पडल्यात जमा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची विश्वासार्हता घसरली आहे.
अस्थिर कर्ज परिस्थितीमुळे देशाची जोखीम वाढली आहे. मागच्या दोन दशकांतील मोठ्या वित्तीय आणि व्यापारी चुकांमुळे देशाच्या कर्जाची स्थिती कमकुवत झाली आहे. FY2023 मध्ये तर कर्ज सेवा खर्च FBR महसुलाच्या 74 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. ते म्हणतात की जागतिक बँकेच्या अहवालानुसार जर का देशाची आर्थिक स्थिरता (Pakistan Economy) मजबूत झाली तर देशाची अर्थव्यवस्था आर्थिक वर्ष 2023 मध्ये 350 अब्ज डॉलर्स वरून 2047 पर्यंत 2 ट्रिलियन पर्यंतचा मोठा पल्ला गाठण्यात यशस्वी होईल. मात्र त्यासाठी पाकिस्तानने संरचनात्मक सुधारणांवर (Structural Reforms) वर काम करण्याची आवश्यकता आहे.