Patanjali: काल सर्वोच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेद आणि आचार्य बाळकृष्ण यांना धक्कादायक नोटीस बजावली आहे. न्यायालयाने म्हटले की, पतंजलीने औषधांसंबंधी जाहिरातींवर बंदी घालण्याच्या 21 नोव्हेंबर 2023 च्या प्रतिज्ञापत्राचे उल्लंघन केले आहे. यामुळे, न्यायालयाने contempt of court कारवाई का सुरू करू नये? अशी विचारणाही केली आहे.
पतंजली आयुर्वेदच्या जाहिरातींवर बंदी: (Patanjali)
सर्वोच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेदला पुढील आदेश येईपर्यंत कोणत्याही वैद्यकीय उत्पादनांची जाहिरात करण्यास मनाई केली आहे, तसेच न्यायालयाने पतंजली आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना कोणतेही वैद्यकीय विधान मीडियामध्ये करण्यापासूनही प्रतिबंधित केले आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की या वादाला ‘ॲलोपॅथी विरुद्ध आयुर्वेद’ बनवण्याचा प्रयत्न केला जात नाही, तर भ्रामक वैद्यकीय जाहिरातींच्या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) आणि पतंजली आयुर्वेद यांच्यातील वाद सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. IMA ने 2022 मध्ये पतंजली आयुर्वेदावर ॲलोपॅथीविरोधात चुकीची माहिती पसरवण्याचा आरोप केला होता. IMA चे वकील पीएस पटवालिया यांनी न्यायालयात पतंजली आयुर्वेदवर योगाच्या मदतीने मधुमेह आणि दमा पूर्णपणे बरा करण्याचा दावा केल्याचा आरोप केला, आता या प्रकरणी सुप्रीम कोर्ट आता 15 मार्च रोजी पुढील सुनावणी करणार आहे.
शेअर्समध्ये मोठी घसरण:
न्यायालयाच्या निर्णयानंतर बुधवारी पतंजली आयुर्वेदच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली(Patanjali). BSE मध्ये पतंजली फूड्सच्या शेअर्समध्ये सुमारे 4 टक्क्यांची घसरण झाली आणि कंपनीचा शेअर 1556 रुपयांवर आला. 105 मिनिटांच्या ट्रेडिंग सत्रात रामदेव यांच्या कंपनीचे सुमारे 2300 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.