Paytm Crisis: Paytm ची संकटं संपण्याचं नाव घेईना; आता परदेशी अहवाल काय सांगतो?

Paytm Crisis: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) Paytm Payments Bank वर कारवाई केल्यानंतर Paytm मध्ये खळबळ उडाली आणि मोठ्या प्रमाणात शेअरमध्ये घसरण झाली आहे. मात्र, स्विस गुंतवणूक बँक आणि वित्तीय सेवा समूह UBS ग्रुपच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की RBI आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCI) मदतीने Paytm आपल्या बहुतांश ग्राहकांची बचत करण्यात यशस्वी होईल. UBSच्या अहवालानुसार Paytmचे व्यापारी आणि ग्राहक सुमारे 20 टक्क्यांनी कमी होऊ शकतात, याचा परिणाम म्हणून कंपनीला आर्थिक वर्ष 2025 मध्ये संघर्ष करावा लागू शकतो. पुढे वॉलेट व्यवसाय बंद झाल्याने कंपनीच्या महसुलावर विपरित परिणाम होणार आहे.

Paytmची आव्हानं काही संपेनात: (Paytm Crisis)

UBSच्या अहवालानुसार, ग्राहक आणि गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकणे हे Paytmसाठी सर्वात मोठे आव्हान आहे. कंपनीला मार्केटिंगवरचा खर्च वाढवावा लागेल, ज्यामुळे EBITDA तोटा वाढण्याची शक्यता आहे. कंपनीचे शेअर 510 ते 650 रुपयांच्या दरम्यान व्यवहार करत आहेत आणि कामगिरी सुधारण्यासाठी बराच कालावधी लागेल. गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यासाठीही कंपनीला प्रयत्न करावे लागतील. RBIच्या FAQ मधून परिस्थिती स्पष्ट झाली आहे आणि Paytm Payments Bankला 15 दिवसांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे.

Paytmच्या UPI हँडलबाबत शंका दूर:

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) Paytm UPI Handle बाबत शंका दूर केल्या आहेत. RBI ने स्पष्ट केले आहे की Paytm व्यापारी इतर बँकांमध्ये हस्तांतरित केले जातील (Paytm Crisis). तसेच, NPCI कडून मंजुरी मिळाल्यानंतर पेटीएम थर्ड पार्टी ॲप प्रोव्हायडर (TPAP) म्हणून काम करू शकेल.