Paytm Shares Today: आज शेअर बाजरीची सुरुवात नकारात्मक; Paytmचे शेअर्स 10 टक्क्यांनी घसरले

Paytm Shares Today: आज आठवड्याच्या पहिल्या दिवशीच, सोमवार 5 फेब्रुवारी 2024 रोजी शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नुकतेच डिजिटल पेमेंट कंपन्यांवर काही निर्बंध लादले आहेत. या निर्बंधांमुळे Paytm सारख्या कंपन्यांवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात होती, आज हीच चिंता खरी ठरली असून सकाळी पेटीएमचे शेअर्स 10 टक्क्यांनी घसरले आहेत. बीएसईने (BSE) पेटीएमच्या स्टॉक्सच्या (Paytm Stocks) लोअर सर्किटचे लिमिट 20 टक्क्यांवरून 10 टक्के कमी केली होते, याचा अर्थ असा होतो की Paytm चे शेअर्स एका दिवसात 10 टक्क्यांपेक्षा जास्त घसरू शकत नाहीत.

Paytm ची आजची स्थिती काय? (Paytm Shares Today)

एक तर आज Paytm च्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांची घसरण झाली, गुंतवणूकदारांचं नुकसान होऊ नये म्हणून BSE ने सर्किट बदललं होतं, मात्र तरीही कंपनीच्या शेअर्सना घसरण्यापासून ते वाचवू शकले नाही. आज कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झालीच, पण त्याच सोबत त्यांना लोवर सर्किटही लागलं. पेटीएमची मागील दोन सत्रांमध्ये 17 हजार कोटी रुपयांनी बाजारपेठेतील भांडवल (Market Cap) कमी झालं आणि यामागे ED चौकशीची बातमी कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.

पेटीएमची पॅरेंट कंपनी One97 Communications ने माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांवर स्पष्टीकरण दिलं आहे. कंपनीने म्हटलं आहे की, ईडीकडून कंपनी किंवा त्याचे संस्थापक आणि CEO विजय शेखर शर्मा यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप लावण्यात आलेले नाही. कंपनीच्या प्लॅटफॉर्मचा वापर करणारे काही सध्या व्यापारी ED च्या चौकशीला सामोरे जात आहेत. One97 Communications ने स्पष्ट केलं आहे की, ते भारतीय कायद्यांचे पालन करतात आणि नियमकांच्या आदेशांचं गांभीर्याने पालन करत आहेत.

Paytm प्रकरणी काय म्हणतात खंडेलवाल?

कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) यांनी व्यापारी वर्गाला Paytm App वापरणं बंद करण्याचा आणि त्याऐवजी दुसऱ्या ॲपचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे (Paytm Shares Today). CAIT चे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “देशाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांसोबत व्यवहार न करता इतर कोणत्याही ॲपचा विचार व्हावा.”