फार्मा क्षेत्रातील ‘या’ कंपनीने गुंतवणूकदारांना दिला कोट्यवधींचा नफा

बिझनेसनामा । गेल्या काही वर्षांत भारतीय शेअर बाजारात अनेक कंपन्यांचे शेअर्स हे मल्टिबॅगर म्हणून उदयास आले आहेत. कॅपलिन पॉइंट लॅबोरेटरीज या फार्मा क्षेत्रातील कंपनीचे शेअर्स देखील याच श्रेणीत येतात. गेल्या काही काळामध्ये हे शेअर्स सातत्याने वाढताना दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वी या कंपनीचे शेअर्स ६ टक्क्यांनी वाढून 775.35 रुपयांवर ट्रेड करत होते. आता इथून पुढेही या कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी 23 टक्क्यांनी वाढ होणार असल्याचा विश्वास विश्लेषकांना आहे.

हे लक्षात घ्या कि, ब्रोकरेज फर्म असलेल्या ICICI सिक्युरिटीजने देखील कॅपलिन पॉइंट लॅबोरेटरीजच्या शेअर्ससाठी 955 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. या ब्रोकरेज फर्मच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेतील होणारी वाढ, विस्तार योजना आणि कंपनीचा वाढता पोर्टफोलिओ या कारणांमुळे कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत यामध्ये गुंतवणुकीची सुवर्ण संधी चालून आली आहे. यासाठी 955 रुपयांपर्यंतच्या टार्गेट प्राईसमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देखील विश्लेषकांनी दिला आहे.

गुंतवणूकदारांना झाले मालामाल

कॅपलिन पॉइंट लॅबोरेटरीजच्या शेअर्समध्ये दीर्घकालावधीत गुंतवणूक करणाऱ्यांना मल्टीबॅगर रिटर्न मिळालेला आहे. यामध्ये फक्त काही हजारांची गुंतवणुक करणारे गुंतवणूकदार आज कोट्यधीश झाल्याचे पाहायला मिळते आहे. 11 नोव्हेंबर 2011 रोजी 4.86 रुपये किंमत असलेले हे शेअर्सची 159 पटीने वाढून आज 775.35 रुपयांवर पोहोचले होते.

अल्पावधीतही दिला मोठा नफा

कॅपलिन पॉइंट लॅबच्या शेअर्सने अल्पावधीमध्येही गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. गेल्या सहा महिन्यांत या शेअर्सने गुंतवणूकदारांना 46 टक्के रिटर्न दिला आहे. गेल्या वर्षी 15 नोव्हेंबर 2021 रोजी हे शेअर्स 890 रुपयांवर होते, त्यानंतर ते 11 मे 2022 पर्यंत सुमारे 30 टक्क्यांनी घसरून 626.30 रुपये पातळीवर आले. मात्र, त्यानंतर याशेअर्समध्ये खरेदी वाढली. सहा महिन्यांत आतापर्यंत 46 टक्के वसुली झाली.

कंपनीचा नफा वाढला

कॅपलिन पॉइंट लॅबोरेटरीज ही पूर्णतः इंटीग्रेटेड फार्मा कंपनी आहे. तसेच या फार्मा कंपनीची लॅटिन अमेरिका, आफ्रिकन फ्रेंच देशांमध्ये चांगलीच पकड आहे. त्याच वेळी, अमेरिका आणि युरोपियन युनियनमध्ये देखील तिचा विस्तार वेगाने वाढतो आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल वार्षिक 18.3 टक्क्यांनी वाढून 359 कोटी रुपये झाला आहे. त्याच वेळी, एडजस्टेड पीएटी (प्रॉफिट आफ्टर टॅक्स) 22.3 टक्क्यांच्या वाढीसह 91.7 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कॅपलिन पॉइंट लॅबोरेटरीजची एकूण मार्केट कॅप 5,877.20 कोटी रुपये आहे.