PM Kisan Credit Card : शेतकऱ्यांना कमी व्याजासह मिळणार कर्ज; काय आहे योजना?

PM Kisan Credit Card : गेल्या कित्येक वर्षापासून भारत हा कृषिप्रधान देश म्हणून जगभरात ओळखला जातोय. आज कितीही तांत्रिक बदल घडून आलेले असले तरीसुद्धा देशातील अनेक गावागावांमध्ये शेतीचा पिढीजात चालत आलेला व्यवसाय तेवढ्याच चिकाटीने आणि मेहनतीने सांभाळा जातोय. असं म्हणतात की आज- कालचे तरुण हे मोठमोठ्या कंपन्या किंवा सरकारी नोकऱ्यांकडे वळत आहेत, पण खोलवर जाऊन विचार केला तर अनेक गावांमध्ये आजही शिक्षित तरुण सुद्धा शेती बागायतीची आवड जोपासून आहेत. भारत सरकारकडून वेळोवेळी शेतकरी मित्रांना आर्थिक मदत पुरवली जाते. त्यामागे सरकारचा असलेलं एकमेव उद्दिष्ट म्हणजे देशातील शेतकरी बांधवांना कोणत्याही प्रकारे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये.

शेतकऱ्यांसाठी सरकार घेऊन आलंय किसान क्रेडिट कार्ड : (PM Kisan Credit Card)

वरती नमूद केल्याप्रमाणे भारत सरकार आजही शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी त्यांना वेळोवेळी आर्थिक मदत पुरवत असतो, यामध्ये पीएम किसान योजना सारख्या अनेक योजना राबवल्या जातात. पिकांचे नुकसान आणि वातावरणातील बदल यांमुळे अनेक शेतकरी आत्महत्येचा मार्ग निवडतात किंवा शेतीचा व्यवसाय पूर्णपणे सोडून देण्याचा विचार करतात. मात्र भारतात पिढीजात पद्धतीने चालत आलेला हा शेतीचा व्यवसाय टिकून राहावा आणि शेतकरी बांधव हताश किंवा निराश होऊ नयेत म्हणून सरकार प्रयत्न करत आहे. सध्या भारत सरकारकडून कमी व्याजासह शेतकऱ्यांना मदत पुरवली जात आहे ज्यामध्ये किसान क्रेडिट कार्ड (PM Kisan Credit Card) याचा समावेश होतो.

सरकारकडून वेळोवेळी आर्थिक मदत मिळाल्यामुळे शेतकरी बिनघोर व्यवसायावर लक्ष केंद्रित करू शकतात. भारत सरकारकडून सुरु केलेली ही किसान क्रेडिट कार्ड योजना नाबार्ड (NBARD) च्या अंतर्गत चालवली जाते. योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याजवळ भली मोठी शेती असायला हवी असा कोणताही नियम नाही. छोट्यातल्या छोटा शेतकरी सुद्धा सरकारकडून या योजनेद्वारे मदत मिळवू शकतो.

किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ कसा मिळवावा?

किसान क्रेडिट कार्ड (PM Kisan Credit Card) योजनेचा सर्वात अनिवार्य भाग म्हणजेच भारतीय नागरिकता, योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळवण्यासाठी तुम्ही भारतीय त्याचप्रमाणे पेशाने शेतकरी असणं महत्त्वाचं आहे. योजनेत नाव नोंदणी करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. इथे आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची नोंद केल्यानंतर दिलेल्या माहितीची उलट तपासणी अधिकाऱ्यांकडून केली जाईल आणि पुढच्या बारा ते पंधरा दिवसांत तुमच्या नावाचे किसान क्रेडिट कार्ड जारी केले जाईल. क्रेडिट कार्डच्या मदतीने तुम्ही कमीत कमी व्याजासह कर्ज घेऊ शकता आणि शेतीतून मिळालेल्या उत्पन्नानंतर कर्जाची परतफेड करू शकता. तुम्ही जर का पीएम किसान योजनेचा भाग असाल तरी सुद्धा किसान क्रेडिट कार्ड (PM Kisan Credit Card) योजनेचा लाभार्थी म्हणून भाग बनता येतं.