PM Kisan Yojana: किसान योजनेची रक्कम 12000 पर्यंत वाढणार का? जाणून घ्या सरकारचे मत

PM Kisan Yojana: केंद्रीय कृषी आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने संसदेला माहिती दिली आहे की PM किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या 6000 रुपये वार्षिक हप्त्याला वाढवून 8000 रुपये ते 12,000 रुपये करण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या त्यांच्या विचारात नाही. ही योजना वर्षातून तीन हप्त्यांमध्ये 2000 रुपये लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवते आणि या रकमेमध्ये कोणतेही बदल होणार नाहीत या माहितीमुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा निर्माण झाली आहे. अनेक शेतकरी संघटना योजनेची रक्कम वाढवण्याची मागणी करत आहेत. ते असा युक्तिवाद करतात की वाढत्या उत्पादन खर्चाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना अधिक आर्थिक मदत आवश्यक आहे. किसान योजनेची रक्कम वाढावी म्हणून मागणी वाढत असताना देखील सरकारने अद्याप या मागणीबाबत कोणताही निर्णय घेतला नाही.

काय आहे PM Kisan Yojana?

भारतातील सर्व शेतीयोग्य जमीन असलेल्या शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रधान मंत्री किसान सम्मान निधि (PM Kisan Yojana) राबवण्यात आली आहे. या योजनेनुसार, प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षी एकूण 6000 रुपये मिळतात. हे पैसे तीन समान हप्त्यांमधून दिले जातात, ज्यामध्ये प्रत्येक हप्त्यामधून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये जमा केले जातात.

आत्तापर्यंत योजनेचे लाभार्थी किती आहेत?

केंद्र सरकारने गेल्या वर्षी 15 नोव्हेंबरला PM किसान योजनेचा 15 वा हप्ता जारी केला होता आणि आतापर्यंत सरकारने 15 हप्त्यांमधून 11 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2.81 लाख कोटी रुपये जमा केले आहेत. चालू आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये शेतकऱ्यांना दोन हप्ते मिळाले असून आता तिसऱ्या हप्त्याची वेळ जवळ आली आहे. याचाच अर्थ असा की, येत्या दोन महिन्यांत म्हणजे मार्च 2024 पर्यंत शेतकऱ्यांना 16 वा हप्ता (PM Kisan Yojana 16th Installment) देखील दिला जाईल.