PM Suryoday Yojana: सूर्योदय योजना करणार 1 कोटी लोकांना मदत; सोबतच मिळणार रोजगाराच्या संधी

PM Suryoday Yojana: अयोध्येत राम मंदिर लोकार्पण सोहळ्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सोलर पॅनेल्स बसवण्याबद्दल मोठी घोषणा केली होती, याला प्रधानमंत्री सूर्योदय योजना असे नाव देखील देण्यात आले होते. देशातील कुटुंबांना अंधारात जीवन जगावं लागू नये म्हणून या योजनेची बांधणी करण्यात आली आहे, आणि आता प्रस्तुत करण्यात आलेल्या बजेटमधून या योजनेला आर्थिक मदत देण्याबद्दल माहिती पुरवण्यात आली. पण तुम्ही हे जाणता का की या योजनेमुळे देशात अनेक रोजगार निर्माण होणार आहेत. कसे? जाणून घेऊया…

PM Suryoday Yojana करणार 1 कोटी लोकांना मदत:

1 तारखेला सादर करण्यात आलेल्या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेल्या माहितीनुसार सूर्योदय योजनेमुळे देशातील एक कोटींहून अधिक कुटुंबांना वार्षिक 18,000 कोटी रुपयांची बचत करता येईल, एवढंच नाही तर यामुळे लोकांना रोजगाराच्या नवीन संधीही मिळतील. सोबतच यासोबतच ही कुटुंबे वीज कंपन्यांना अतिरिक्त वीज विकून अतिरिक्त उत्पन्नही मिळवू शकणार आहेत. या योजनेअंतर्गत निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा पुरवठा करण्यासाठी कुशल तरुणांना रोजगार मिळेल, ज्यामुळे भविष्यात रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होतील असा विश्वास अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

भारताची ‘नेट झिरो’ मोहिम आणि पवन ऊर्जेचा वाढता वापर:

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात 2070 पर्यंत ‘नेट झिरो’ लक्ष्य साध्य करण्याची भारताची इच्छा व्यक्त केली. यासाठी पर्यावरणपूरक ऊर्जास्रोतांना प्रोत्साहन देण्यावर सरकार भर देणार आहे(PM Suryoday Yojana). सौर ऊर्जेसोबतच पवन ऊर्जा स्त्रोतांना चालना देण्यासाठी सरकार अतिरिक्त निधीची तरतूद करणार आहे.

सरकार सरकारी वीज कंपन्यांना पवन ऊर्जेद्वारे 1,000 मेगावॅट वीज निर्मितीसाठी निधी उपलब्ध करून देणार आहे. यामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत होण्यास मदत होईल आणि कार्बन उत्सर्जन कमी होईल. दुसऱ्या बाजूला बायोगॅस हा ऊर्जेचा स्वच्छ आणि नवीन स्रोत आहे, म्हणूनच बायोगॅस बनवण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदीसाठी सरकार शेतकऱ्यांना आणि इतर नागरिकांना आर्थिक मदत करेल.