Pulses Price Hike : डाळीचे दर आटोक्यात आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न; घेतलाय ‘हा’ महत्वाचा निर्णय

Pulses Price Hike : भारतात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना प्रत्येक वेळेस वाढत्या महागाईचा झटका बसतोच. भारतात वापरणारी सर्वाधिक लोकसंख्या ही मध्यमवर्गीय आहे, याचाच अर्थ असा की भारतातील अनेक लोकं प्रत्येक दिवशी काम करून महिन्याला पगार मिळवतात व या मिळालेल्या पगाराच्या अनुसार संपूर्ण महिन्याचं नियोजन तयार केलं जातं. म्हणूनच, महागाईच्या दरांमध्ये आलेला थोडासा चढ उतार हे नियोजन कायमचं कोलमडून टाकू शकतो. काही दिवसांपूर्वी कांदा, टोमॅटो, लसूण अशा प्रत्येक जीवन आवश्यक घटकांचे दर वाढायला सुरुवात झाली होती, आणि त्याचा जबर फटका देशातील मध्यमवर्गीय कुटुंबांनी सहन केला होता. काही अंशी कांदा आणि टोमॅटो यांचे दर आटोक्यात आले असले तरी डाळींच्या किमती मात्र आकाशाला भिडल्या आहेत आणि भारत सरकारकडून जनसामान्याला महागाईचा अजून जास्त त्रास सहन करावा लागू नये म्हणून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय….

देशात वाढल्या डाळींच्या किमती: (Pulses Price Hike)

सध्या देशात सर्वत्र निवडणुकांचा वारं वाहत असताना मोदी सरकार समोर असलेलं मोठं आव्हान म्हणजे डाळींच्या वाढत्या किमती आहेत. निवडणुकीच्या या निर्णायक काळात नक्कीच सरकारला कुठलीही जोखीम पत्करायची नाही, आणि म्हणूनच केंद्र सरकारकडून उडीद आणि तूर डाळ यांच्या किमती आटोक्यात आणण्यासाठी आता या डाळींच्या शुल्कमुक्त आयातीचा कालावधी एक वर्षभर वाढवण्यात आला आहे, म्हणजेच आता आयातीचा नवीन कालावधी 31 मार्च 2025 पर्यंत वैध असेल. या नवीन निर्णयामुळे सर्वसामान्यांना स्वस्तात डाळ उपलब्ध होणार आहे.

गेल्या आठवड्यात, सरकारने मसूरवरील शून्य आयात शुल्क 31 मार्च 2025 पर्यंत वाढवले ​​होते. वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या DGFT ने गुरुवार 28 डिसेंबर 2023 रोजी या निर्णयाबाबत अधिसूचना जारी केली आहे. यापूर्वी उडीद आणि तूर डाळीच्या शुल्कमुक्त आयातीचा कालावधी केवळ 31 मार्च 2024 पर्यंत सीमित करण्यात होता. मात्र आता केंद्र सरकारने नवीन अधिसूचना जारी करत ही मुदत एक वर्षासाठी वाढवली आहे.

डाळीच्या किमती आटोक्यात आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न:

नोव्हेंबर 2023 मध्ये किरकोळ महागाईच्या दरांमध्ये अचानक भली मोठी वाढ नोंदवण्यात आली होती आणि याला खाद्यपदार्थांच्या किमतीत झालेली वाढ सर्वस्वी जबाबदार ठरवली जात आहे. या महागाईच्या काळात डाळींच्या दरांमध्ये मोठी वाढ दिसून आली होती. ऑक्टोबर 2023 मध्ये 18.79 टक्के असलेल्या डाळीच्या किमती नोव्हेंबर महिन्यात 20.23 टक्क्यांवर जाऊन पोहोचल्या. गेल्या एक वर्षाच्या कालावधीतील तूर डाळीच्या किमतींवर नजर टाकल्यास, 28 डिसेंबर 2022 रोजी तूर डाळीची सरासरी किंमत 111.5 रुपये प्रति किलो होती, जी डिसेंबर 2023 रोजी वाढून 152.38 रुपये प्रति किलो झाली आहे. म्हणजेच तूर डाळीचे भाव सुमारे 37 टक्क्यांनी वाढले आहेत (Pulses Price Hike).

डाळींच्या याच वाढत्या किमती लक्षात घेता केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे, ज्यात तूर डाळ आणि उडीद डाळींच्या साठ्याची मर्यादा कमी करणे आणि त्याचा कालावधी वाढवणे यांचा समावेश होतो. साठेबाजीला आळा घालण्यासाठी आणि बाजारात तूर डाळ आणि उडीद डाळ वाजवी दरात उपलब्ध करून देता यावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे, मात्र तरीही डाळीच्या वाढत्या किमतीवर सरकार पूर्णपणे पकड बसवू शकलेले नाही.