Ram Mandir Opening : राममंदिर लोकार्पण सोहळ्यामुळे होणार तब्बल 50 हजार कोटींची उलाढाल

Ram Mandir Opening : जानेवारी महिन्यात राम जन्मभूमी अयोध्या येथे होणाऱ्या मंदिर लोकार्पण सोहळ्याचा उत्साह सर्व भारतीयांच्या मनात तुडुंब भरला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देशवासी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण आता काही दिवसांवर येऊन ठेपलाय आणि 22 जानेवारी रोजी श्रीराम पुन्हा एकदा अयोध्येच्या सिहांसनावर विराजमान होतील. हा ऐतिहासिक क्षण अनुभवता यावा म्हणून अनेक व्यवसायिक कामात रुजू झाले आहेत. तसेच हा लोकार्पण सोहळा देशभरातील अनेकांना भरपूर नफा कमावून देणार आहे.माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या नवीन मंदिर निर्मितीमुळे देशभरात 50 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपयांची उलाढाल होऊ शकते. आज जाणून घेऊया कि नेमका कुठून आणि कसा उभा राहील एवढा मोठा पैसा …

राम मंदिरामुळे देशात होणार मोठा व्यवहार: (Ram Mandir Opening)

अनेक वर्षांचा प्रयत्नानंतर आता 2024 मध्ये श्रीराम पुन्हा एकदा अयोध्येचा कारभार हाती घेणार आहेत आणि राम जन्मभूमीवर उभ्या होत असलेल्या या मंदिरामुळे देशातील अनेक व्यवसायिकांना मोठा फायदा मिळेल. भारताच्या दृष्टीने ऐतिहासिक क्षण म्हणून कायमस्वरूपी लक्ष्यात राहणार हा सोहळा देशात 50 हजार कोटी रुपयांचा फायदा करवून देणार आहे. त्यामुळे फक्त श्रीरामांच्या भक्तांसाठीच नाही तर देशातील व्यापाऱ्यांसाठी देखील हा दिवस सर्वात महत्वाचा असेल. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स म्हणजेच CAIT चे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार 1 जानेवारीपासून CAIT च्या नेतृत्वाखाली प्रत्येक दुकान तसेच बाजारांमध्ये जाऊन श्रीरामांबद्दल जनजागृती करण्यात येईल, आणि प्रत्येक शहर तसेच राज्यांमध्ये अयोध्येचे निर्माण केले जाईल.

विश्व हिंदू परिषदेच्या आवाहनावरून देशभरात श्रीराम मंदिराच्या उद्घाटन (Ram Mandir Opening) सोहळ्यासाठी 1 जानेवारीपासून विशेष मोहिम राबवण्याची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामुळे संपूर्ण देशभरातील लोकांच्या मनामध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण झालाय. अयोध्या राम मंदिराच्या निर्मितीमुळे देशातील सर्वच राज्यांमध्ये मोठ्या व्यवसायाच्या संधी दिसत आहेत, यावरुन येत्या जानेवारी महिन्यात 50 हजार कोटींहून अधिकचा व्यवसाय होईल, असा अंदाज वर्तवला जातोय.

या वस्तूंची होणार मोठी विक्री:

खंडेलवाल यांच्या माहितीनुसार अयोध्येत होणाऱ्या मंदिर लोकार्पण सोहळ्यामुळे (Ram Mandir Opening) स्थानिक व्यवसायिकांना भरपूर फायदा होईल. देशात सध्या सर्वच बाजारपेठांमध्ये राम ध्वज, रामाचे चित्र कोरलेले हार, राम अंगवस्त्र, लॉकेट, चावीच्या अंगठ्या, राम दरबाराचे चित्र, राममंदिराच्या मॉडेलची चित्रे, सजावटीचे पेंडेंट आदी साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहेत. तुम्ही सोशल मीडियावर पहिलाच असेल कि सध्या राम मंदिराच्या मॉडेलला सर्वात अधिक मागणी असून मागेल त्या दरांत त्याची विक्री केली जात आहे. हे मॉडेल हार्डबोर्ड, प्लायवूड, लाकूड इत्यादी वेगवेगळ्या घटकांपासून बनवण्यात येते आणि ग्राहकांच्या मागणीनुसार ते विविध आकारांमध्ये तयार केले जात आहे. यामुळे देशातील महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला असून, अनेक कारागीर, कलाकार आणि कामगारांना पैसे मिळाले आहेत.

शिवाय भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात कुर्ते, टी-शर्ट आणि इतर कपड्यांवर काम सुरु आहे, यांची विशेषता म्हणजे या प्रकारच्या कपड्यांवर श्री राम मंदिराचे मॉडेल हँड एम्ब्रॉयडरी किंवा प्रिंट केले जाईल. लक्ष्यात घ्या कि हे कुर्ते बनवण्यासाठी खादीचा वापर केला जात आहे. मातीचे दिवे, रांगोळी काढण्यासाठी वेगवेगळे रंग, फुलांच्या सजावटीसाठी फुले आणि बाजारपेठा, सजावटीसाठी विजेचे दिवे तयार करणाऱ्या क्षेत्रालाही राम मंदिर निर्माणामुळे मोठा फायदा होईल. देशभरात लोकांच्या मनात असलेला उत्साह पाहता वेगवेगळे होर्डिंग्स, बोर्डस, बॅनर आणि पत्रके यांचाही व्यवसाय जोमाने सुरु असल्याची चिन्हे दिसत दिसत आहेत.

महर्षी वाल्मीकींच्या नावे सुरु होणार विमानतळ:

सर्व प्रकारच्या क्षेत्रांमध्ये राम मंदिर निर्मितीचा उत्साह पाहायला मिळतोय आणि अयोध्येत सध्या रामायणाचे रचते महर्षी वाल्मिकी यांच्या नावे विमानतळाची निर्मिती सुरु असून, श्रीरामांच्या दर्शनासाठी येणाऱ्या जनसंख्येला प्रवासाचा आनंद घेता यावा म्हणून विमानसेवेची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शनिवारी देशाच्या पंतप्रधानांच्या हातून या विमानतळाचे उदघाटन केले जाईल, विमानतळाच्या निर्मितीमध्ये आत्तापर्यंत 1,450 कोटी रुपयांचा खर्च करून पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला आहे.

राम मंदिरातील आरतीसाठी करा ऑनलाईन बुकिंग:

22 तारखेला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात तुम्ही ऑनलाईन आरतीमध्ये सामील होऊ शकता, आणि याचे ऑनलाईन बुकिंग गुरुवारपासून सुरु झाले आहे. ब्लॉक मॅनेजर ध्रुवेश मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभू रामचंद्रांची आरती दिवसातून तीन वेळा केली जाईल. या आरतीत सहभागी होण्यासाठी तुम्ही राम मंदिराच्या ऑनलाईन पोर्टल वरून पास बनवून घेऊ शकता, जो केवळ अयोध्या अकाउंटवर उपलब्ध असेल. यासाठी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट यापैकी एका कागदपत्रांची गरज पडणार आहे.