बिझनेसमनामा ऑनलाईन । देशातील जनतेची प्रभू श्रीरामांवर मोठ्या प्रमाणावर श्रद्धा आहे. भारतातील कोट्यवधी लोक अभिमानाने आणि मोठ्या स्फूर्तीने जय श्रीरामचा नारा देताना आपण पाहतोय. अयोध्यात तर प्रभू श्रीरामाचे मंदिर सुद्धा तयार होण्याचे काम पूर्णत्वाला आलं आहे. त्यामुळे रामभक्तांमध्ये आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण आहे. रामभक्तांच्या या आनंदात आता आणखी भर पडणार आहे. कारण लवकरच केंद्र सरकारकडून रामायण सर्किट योजना (Ramayana Circuit) सुरु करण्यात येणार असून या माध्यमातून प्रभू श्रीराम ज्या ज्या ठिकाणी गेले, राहिले त्या त्या ठिकाणांना जोडण्याचे काम केंद्रातील मोदी सरकार करणार आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील वाहतुकीचे जाळे आणखी मजबुत करण्याचा सरकारचा उद्देश आहे. तसेच यामुळे देशातील पर्यटनाला सुद्धा चालना मिळणार आहे.
काय आहे रामायण सर्किट – (Ramayana Circuit)
रामायण सर्किट योजना हि केंद्रातील मोदी सरकारची महत्वाकांक्षी योजना मानली जातेय. या योजनेअंतर्गत प्रभू श्रीराम त्यांच्या जीवनात १४ वर्षांच्या वनवासाच्या काळात जिथे जिथे गेले, वास्तव्य केलं अशा देशातील एकूण ९ राज्यातील १५ ठिकाणांना एकमेकांना जोडण्याचे काम केंद्र सरकार करतंय . रेल्वे, विमान आणि रस्त्याच्या माध्यमातून ही सर्व ठिकाणे एकमेकांना जोडण्याचा सरकारचा मानस आहे. येव्हडच नव्हे तर आपल्या शेजारील देश असलेल्या नेपाळ आणि श्रीलंकेलाही या रामायण सर्किट योजनेच्या अंतर्गत जोडण्याचा केंद्रातील मोदी सरकारचा प्रयत्न आहे. देवावर श्रद्धा असलेल्या आणि पर्यटनाची हौस असणाऱ्या लोकांसाठी रामायण सर्किट योजना फायदेशीर ठरणार आहे.
देशातील कोणकोणत्या स्थळांचा समावेश –
रामायण सर्किट योजनेमध्ये (Ramayana Circuit) अयोध्या, श्रृंगवेरपुर आणि चित्रकूट (उत्तर प्रदेश), सीतामढी, बक्सर आणि दरभंगा (बिहार), जगदलपुर (छत्तीसगढ़), नंदीग्राम (पश्चिम बंगाल, चित्रकूट (मध्य प्रदेश), महेंद्रगिरी (ओडिशा), रामेश्वरम (तमिलनाडु), भद्राचलम (तेलंगाना), हम्पी (कर्नाटक) व महाराष्ट्रातील नाशिक आणि नागपुरचा समावेश करण्यात आला आहे. म्हणजेच देशाच्या पूर्व आणि उत्तरेपासून दक्षिण भारतातील अनेक ठिकाणे या प्रकल्पाअंतर्गत जोडली जात आहेत.
मोदी सरकारचा मुख्य उद्देश काय ?
रामायण सर्किट (Ramayana Circuit) लवकरात लवकर पूर्ण करण्याकडे सरकार प्रयत्न करून पर्यटकांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याचं काम केंद्रीय पर्यटन मंत्रालय करेल. रामायण सर्किटच्या माध्यमातून वरील सर्व शहरांमध्ये वाहतूक व्यवस्था बळकट करणे, या सर्व ठिकाणांना राष्ट्रीय महामार्गाने जोडणे तसेच रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर सरकारचा भर असणार आहे. ज्या ठिकाणी विमानतळाची सोय नाही तेथे नवीन विमानतळ सुद्धा बांधण्यात येणार आहे. त्यामुळे देशभरातील रामभक्तांसाठी ही मोठी आनंदाची बाब आहे.