1000 ची नोट बाजारात येणार? RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी स्पष्टच सांगितलं

बिझनेसनामा ऑनलाईन । 2016 मध्ये पहिल्यांदा देशात नोटबंदी करण्यात आली होती. त्यानंतर आता RBI ने 2000 च्या नोटा चलनातून वगळल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी ग्राहकांना 30 सप्टेंबर पर्यंत 2000 च्या सर्व नोटा बँकेत जमा करण्यास सांगितलेलं आहे. 2016 मध्ये करण्यात आलेल्या नोटबंदीवेळी 500 आणि 1000 च्या नोटा बॅन करण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे आता बॅन करण्यात आलेल्या 2000 च्या नोटांचा परिणाम ग्राहकांवर एवढा जाणवला नाही. परंतु आता ग्राहकांच्या मनात एक प्रश्न निर्माण झालेला आहे. ज्याप्रमाणे आता 2000 च्या नोटा बंद करण्यात आल्या त्याचप्रमाणे काही महिन्यानंतर 100 आणि 500 च्या नोटा बंद होतात की काय ही भीती ग्राहकांच्या मनात निर्माण झाली आहे.

भारतात 2000 च्या नोटांपेक्षा 500 च्या नोटा मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. जर या 500 या नोटा बंद झाल्या तर नागरिकांना पुन्हा बँकेची वारी करत फिरावे लागेल का? किंवा आता आरबीआय 1000 रुपयांच्या नोटा चलनात आणेल का? असा प्रश्न ग्राहक विचारत आहेत. यावर आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी मोठं विधान केलं आहे. सरकारचा अजूनही 1000 रुपयाची नोट जारी करण्याचा कोणताच प्लान नाही असे शक्तीकांत दास यांनी स्पष्ट केलं आहे.

सध्या बाजारात बाकीच्या मूल्यांच्या नोटा मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे बाजारात कोणतीही नवीन नोट आणण्याचा विचार नसल्याचं शक्तीकांत दास म्हणाले. त्याचबरोबर दोन हजार रुपयांच्या नोटा 30 सप्टेंबर पर्यंत बँकेत जमा झाल्यानंतर काय करायचे याचा निर्णय त्यानंतर घेऊ. जेव्हा एखादे चलन व्यवहारातून काढून टाकले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा होत नाही कि नवीन कोणतेही चलन बाजारात आणलेच पाहिजे असेही त्यांनी म्हंटल.