Reliance-Disney Merge: Reliance आणि Disneyचा ऐतिहासिक करार; मनोरंजन क्षेत्राचा ठरेल का बादशहा?

Reliance-Disney Merge: आपल्या देशातील अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज, वायकॉम 18 आणि वॉल्ट डिस्ने कॉर्पोरेशन यांच्यातील बहुप्रतीक्षित विलीनीकरणाची चर्चा आता अंतिम टप्प्यात आली आहे. बुधवारी दोन्ही कंपन्यांनी या ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केली. या करारानुसार, Viacom 18 आणि Star India च्या टेलिव्हिजन आणि डिजिटल स्ट्रीमिंग व्यवसायांचे विलीनीकरण होणार आहे.

शेवटी हातमिळवणी झालीच: (Reliance-Disney Merge)

या विलीनीकरणानंतर स्थापन होणाऱ्या संयुक्त उपक्रमाचे मूल्य अंदाजे 70,352 कोटी रुपये एवढे असेल, आणि या विलीनीकरणामुळे भारतीय मनोरंजन क्षेत्रात एका नवीन दिग्गज कंपनीचा उदय होणार आहे. या करारानुसार, रिलायन्स सदर संयुक्त उपक्रमात 11,500 कोटींची गुंतवणूक करेल. दोन्ही दिगज्जांची हातमिळवणी झाल्याने हा करार 2024 च्या शेवटच्या तिमाहीत किंवा 2025 च्या पहिल्या तिमाहीत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. विलीनीकरण पूर्ण झाल्यानंतर, नवीन उपक्रम रिलायन्सच्या ताब्यात असेल आणि RILकडे 16.34 टक्के, Viacom 18 कडे 46.82 टक्के आणि Disney कडे 36.84 टक्के हिस्सा दिला जाईल.

नवीन कंपनीच्या अध्यक्षपदी कोण?

Reliance आणि Disney यांच्या मीडिया व्यवसायांच्या विलीनीकरणामुळे नीता अंबानी यांना ‘Disney-Star’ नावाच्या नवीन कंपनीची अध्यक्षा बनण्याची संधी मिळाली आहे. कला, क्रीडा आणि बॉलीवूड या क्षेत्रातील 60 वर्षीय नीता अंबानी यांचा अनुभव या नवीन भूमिकेत निश्चितच फायदेशीर ठरेल.

काय म्हणाले अंबानी?

रिलायन्स आणि डिस्ने यांच्यातील विलीनीकरणाबाबत बोलताना रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी या कराराला “ऐतिहासिक” आणि “भारतीय मनोरंजन उद्योगात नव्या युगाची सुरुवात” असे संबोधले.

जागतिक स्तरावर सर्वोत्तम माध्यम समूह म्हणून डिस्नेचा आदर करणारे अंबानी यांनी या संयुक्त उपक्रमाबाबत उत्सुकता व्यक्त केली(Reliance-Disney Merge). डिस्नेला रिलायन्स समूहाचा प्रमुख भागीदार म्हणून स्वागत करताना, त्यांनी या विलीनीकरणामुळे भारतीय ग्राहकांना उत्कृष्ट मनोरंजनाचा अनुभव मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.