Reliance चा मोठा रेकॉर्ड!! वर्षभरात 2.60 लाख लोकांना दिल्या नोकऱ्या

बिझनेसनामा ऑनलाईन । प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीने मोठा रेकॉर्ड बनवला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये रिलायन्सने तब्बल 2.60 लाख लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत. यामधील 1.8 लाख लोक रिटेलमध्ये सामील झाले, तर 70,500 लोकांनी जिओमध्ये नोकरी केली. रिलायन्स इंडस्ट्रीजने वर्षभरातच 2,62,558 नोकऱ्या निर्माण करून भारतीयांसाठी रोजगाराचा नवा विक्रम केला आहे.

सध्या रिलायन्सकडे 2,45,581 ऑन-रोल कर्मचारी –

कंपनीच्या वार्षिक अहवालानुसार, सध्या रिलायन्सकडे 2,45,581 ऑन-रोल कर्मचारी असून रिलायन्स रिटेलला देशातील सर्वात मोठ्या नियोक्त्यांपैकी एक म्हणून ओळखले जाते. सध्या RIL ची एकूण एकूण कर्मचारी संख्या 3.89 लाख झाली आहे. सलग तिसऱ्या वर्षी रिलायन्स इंडस्ट्रीज मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध करून देत आपली छाप पाडली आहे.

यापूर्वीही रिलायन्सने दिल्या भरपूर नोकऱ्या –

यापूर्वी 2021-22 च्या आर्थिक वर्षात रिलायन्सने तब्बल 2 लाख 32 हजार लोकांना नोकऱ्या दिल्या होत्या. तसेच 2020- 21 च्या आर्थिक वर्षात संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट असताना आणि लॉकडाउन मुळे सर्वत्र मंदीचे सावट असतानाही रिलायन्सने त्यावेळी 75 हजार नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या होत्या. संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आणि सक्षम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून जे एक राष्ट्रीय कर्तव्यच आहे असं त्यावेळी मुकेश अंबानी यांनी RIL च्या 44 व्या एजीएममध्ये म्हंटल होते.

सर्वाधिक टॅक्स भरणारी कंपनी –

दरम्यान, वार्षिक अहवालानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज यंदाही सर्वात जास्त टॅक्स भरणारी कंपनी ठरली 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या ,मागील आर्थिक वर्षात, रिलायन्स इंडस्ट्रीजने कर म्हणून सरकारकडे 1.77 लाख कोटी रुपये जमा केले होते. तसेच त्याच्या पूर्वीही म्हणजेच 2021-22 या आर्थिक वर्षात, रिलायन्स इंडस्ट्रीजने टॅक्सच्या रूपात 1.88 लाख कोटी रुपये जमा केले होते.