रोजगार मेळावा!! 70 हजार तरुणांना नोकऱ्या मिळणार; मोदी देणार नियुक्ती पत्र

बिझनेसनामा ऑनलाईन । देशातील बेरोजगारांसाठी खुशखबर मोठी आनंदाची बातमी आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या तब्बल 70 हजार तरुणांना नोकरीचे नियुक्ती पत्र देणार आहेत. उद्या म्हणजेच मंगळवारी सकाळी 10.30 वाजता पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तरुणांना नोकऱ्या देणार आहेत. उद्या संपूर्ण देशभरात 43 ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित केले जाणार आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये या नियुक्त्या करण्यात येत आहेत. त्यामुळे युवा वर्गात मोठं उत्साहाचे वातावरण आहे.

कोणकोणत्या विभागात नोकऱ्या मिळणार-

शालेय शिक्षण विभाग, उच्च शिक्षण विभाग, रेल्वे मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, कर्मचारी आर्थिक सेवा विभाग, पोस्ट विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, महसूल विभाग, अणुऊर्जा विभाग, गृह मंत्रालय यांसारख्या सरकारच्या विविध विभागांमध्ये देशभरातून नव्याने निवड झालेलया कर्मचाऱ्यांना नोकऱ्या मिळणार आहे. नियुक्तीपत्र मिळताच ते कामावर हजर होतील.

नव्याने नोकरीची संधी मिळालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना iGOT कर्मयोगी पोर्टलवरील ऑनलाइन मॉड्यूल, कर्मयोगी Prarambh द्वारे स्वतःला प्रशिक्षण देण्याची संधी सुद्धा मिळत आहे. यामध्ये जिथे 400 पेक्षा जास्त ई-लर्निंग कोर्स उपलब्ध आहेत. हे कर्मचारी कुठूनही आणि कोणत्याही उपकरणाद्वारे त्याच्याशी कनेक्ट होऊ शकतात.

रोजगार मेळावा म्हणजे नेमकं काय?

देशातील वाढत्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी आणि रोजगार निर्मितीची गती वाढवण्याची केंद्र सरकारने उचललेलं मोठं पाऊल म्हणजे रोजगार मेळावा आहे. यापूर्वी 16 मे 2023 रोजी नरेंद्र मोदी यांनी रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून 71 हजार तरुणांना नियुक्ती पत्र दिले होते. तसेच या अंतर्गत येत्या दीड वर्षात 10 लाख लोकांना सरकारी नोकऱ्या दिल्या जातील अशी घोषणाही मोदींनी केली होती.