SBI Q3 Results: स्टेट बैंक ऑफ इंडियाच्या तिमाही निकालांची उत्सुकता संपली; मात्र वाढली का बँकची चिंता?

SBI Q3 Results: आज म्हणजेच शनिवारी, स्टेट बैंक ऑफ इंडियाने (SBI) त्यांचा डिसेंबर तिमाहीची परिणाम जाहीर केला आहे. निकाल जाहीर होण्याअगोदर काही तज्ञांकडून या तिमाहीत बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नांत (NII) घट होण्याची शक्यता वर्तवली गेली होती. तसेच तिसऱ्या तिमाहीतील NII ची वार्षिक वाढ गेल्या 10 तिमाहीतील सर्वात कमी पातळीवर पोहोचू शकण्याच्या चर्चा सुरु होत्या. आज बँकेने तिमाही निकाल जाहीर केलेला असून या सर्व किंतु, परंतुंना उत्तरं मिळाली आहेत. लक्ष्यात घ्या की SBI आपल्या देशातील सार्वधिक प्रसिद्ध आणि मोठा ग्राहकवर्ग असलेली बँक म्हणून प्रसिद्ध आहे, म्हणूनच आज समोर आलेल्या आकड्यांचा परिणाम बँकांच्या भविष्यातील वाढीच्या संभावनांवरही परिणाम होऊ शकतो.

असा आहे SBI Q3 Results:

SBI ने आज 3 फेब्रुवारी रोजी आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीसाठी 9,163 कोटी रुपयांचा निव्वळ नफा जाहीर केला आहे, मात्र याला मागील वर्षाच्या याच कालावधीमध्ये झालेल्या 14,205 कोटी रुपयांच्या तुलनेत 35 टक्क्यांची घट म्हणावी लागेल आणि हा निव्वळ नफा विश्लेषकांच्या अंदाजापेक्षा कमीच आहे.

देशातील सर्वात मोठ्या बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न (NII) 39,815 कोटी रुपये असून हा आकडा देखील अंदाजित 40,304 कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. बँकेचा Gross NPA गेल्या वर्षाच्या तुलनेत घटून 2.42 टक्के एवढा कमी झालाय, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीत 3.14 टक्के होता. दुसरीकडे, Net NPA चा आकडा 0.64 टक्के असून मागील वर्षी हाच आकडा 0.77 टक्के होता. यावरून बँकेची थकबाकी रक्कम कमी झाल्याचे दिसून येते, आणि अंदाजित उत्पन्नापेक्षा कमी असलेला NII चिंतेचा विषय ठरू शकतो.

काय होता विश्लेषकांच्या अंदाज?

CNBC टीव्ही 18 ने एकत्र केलेल्या मतांनुसार, बँकेची निव्वळ व्याज उत्पन्न (NII) वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत 6.3 टक्के आणि सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत 2.2 टक्के असण्याचा अंदाज व्यक्त केला गेला होता. तसेच काल SBIच्या निव्वळ नफ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.9 टक्क्याची घट होण्याची शक्यता वर्तवली गेली होती. कर्ज वितरणाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, बँकेची कामगिरी गेल्या वर्षीच्या तुलनेत 14 टक्के आणि सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत 4 टक्क्यांनी वाढेल असे अनेक जणांचे मत होते (SBI Q3 Results).