बिझनेसनामा ऑनलाईन । जुलै 2023 पर्यंतचा भारतातील सरासरी वेतन सर्वेक्षण डेटा समोर आला आहे. या आकडेवारीनुसार, शहरांमधील सर्वाधिक वार्षिक सरासरी पगाराच्या बाबतीत महाराष्ट्रातील सोलापूर या शहराने बाजी मारली आहे. मुंबई, पुणे, बेंगलोर आणि दिल्ली यांसारख्या मोठ्या शहरांना मागे टाकत सरावात जास्त पगार देण्याच्या यादीत सोलापूरने पहिला क्रमांक पटकावला आहे. आकडेवारीनुसार, सोलापुरातील वार्षिक सरासरी पगार हा २८ लाख १० हजार ९२ रुपये असल्याचे स्पष्ट झालं आहे.
मुंबईचा दुसरा क्रमांक –
या यादीमध्ये देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा दुसरा क्रमांक असून मुंबईचा वार्षिक सरासरी पगार 21,17,870 रुपये आहे. आयटी हब म्हणून ओळखले जाणारे बंगलुरू शहराचा देशात तिसरा नंबर लागत असून सरासरी वार्षिक वेतन 21,01,388 रुपये आहे. तर देशाची राजधानी असलेल्या दिल्लीचा
सरासरी वार्षिक पगार 20,43,703 रुपये असून या यादीत चौथा क्रमांक लागतोय. ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये सरासरी वार्षिक वेतन 19,94,259 रुपये आहे तर जोधपूरमध्ये ते 19,44,814 रुपये आहे. पुणे आणि श्रीनगरमधील व्यावसायिकांचे सरासरी वार्षिक वेतन 18,95,370 रुपये आहे.
राज्यांमध्ये उत्तरप्रदेश नंबर 1 –
राज्यांच्या महिन्याचा सरासरी वेतनाचा विचार केल्यास यामध्ये उत्तरप्रदेशचा पहिला क्रमांक लागतोय. यूपीमध्ये दर महिन्याला २०,७३० रुपये सरासरी पगार मिळतो तर दुसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगाल असून त्याठिकाणी वार्षिक २०,२१० रुपये पगार मिळत आहे. महाराष्ट्र या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असून आपल्या राज्यात दर महिन्याचा सरासरी पगार हा २०,११० रुपये आहे.
पुरुषांना महिलांपेक्षा जास्त पगार –
या अहवालानुसार, देशात महिलांपेक्षा पुरुष कमाईच्या बाबतीत अग्रेसर असून महिलांच्या तुलनेत पुरुषांना जास्त पगार मिळत आहे. आकडेवारीनुसार, पुरुषांनावार्षिक सरासरी १९ लाख ५३ हजार रुपये पगार मिळतो तर दुसरीकडे महिलांना १५ लाख १६ हजार रुपयांपेक्षा जास्त पगार मिळतो. 20 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या लोकांना 38 लाख 15 हजार 462 रुपये पगार दिला जातो. तर 16 ते 20 वर्षांचा अनुभव असलेल्या लोकांना 36 लाख 50 हजारांहून जास्त पगार मिळतो.