बिझनेसनामा ऑनलाईन । हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष एसपी हिंदुजा यांचे नुकतेच निधन झाले. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. त्यांनी वयाच्या १८ व्या वर्षातच वडिलांच्या व्यवसायात सुरुवात केली आणि जवळपास 70 वर्षे कंपनीची सेवा करत केवळ आपल्या मेहनतीच्या जोरावर कंपनीला नवीन उंचीवर नेले.
एसपी हिंदुजा हे परमानंद दीपचंद हिंदुजा यांचे ज्येष्ठ पुत्र होते. 28 नोव्हेंबर 1935 रोजी कराची (आता पाकिस्तान) येथे त्यांचा जन्म झाला. एसपी हिंदुजा यांचे शिक्षण आर.डी. नॅशनल अँड डब्ल्यू.ए. सायन्स कॉलेज आणि हैदराबाद (सिंध) नॅशनल कॉलेजिएट बोर्ड येथे झाले. हिंदुजा बंधूंमध्ये श्रीचंद पी हिंदुजा हे ज्येष्ठ होते. गोपीचंद हिंदुजा हे दुसरे भाऊ, प्रकाश पी. हिंदुजा हे तिसरे आणि अशोक पी. हिंदुजा हे सर्वात धाकटे भाऊ आहेत. मित्रांमध्ये एसपी म्हणून ओळखले जाणारे श्रीचंद हिंदुजा 1952 मध्ये शिक्षण पूर्ण होताच आपल्या कौटुंबिक व्यवसायात सामील झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली अचूक रणनीती, मेहनत आणि व्यवसायातील विविधता, दूरदृष्टी या जोरावर हिंदुजा समूह अधिक उंचीवर जात राहिला.
एसपी हिंदुजा यांनी आपल्या कौटुंबिक व्यवसायाचा विस्तार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हिंदुजा समूहाचा व्यवसाय जगातील जवळपास सर्व प्रमुख देशांमध्ये पसरलेला आहे . आज त्यांचा व्यवसाय हेल्थकेअर, ऑटो, आयटी, मीडिया आणि एंटरटेनमेंट, बँकिंग आणि फायनान्स, पॉवर जनरेशन, रिअल इस्टेट, ऑइल आणि स्पेशॅलिटी केमिकल्स यासह अनेक क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, एसपी हिंदुजा यांची एकूण संपत्ती सुमारे $3.6 अब्ज होती.