Spicejet Layoff: महागाई आणि बेरोजगारीच्या जगभरातील संकटामुळे टाळेबंदीची लाट आता भारतातही परिणाम करत आहे. भारतातील बजेट एअरलाइन म्हणजेच स्पाइसजेटने हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आणि यामुळे कंपनीच्या कर्मचारी वर्गाला मोठा झटका बसला आहे. कंपनी आर्थिक संकटातून जात असल्याने हा निर्णय घेण्यात आलाय असे अनेकांचे म्हणणे आहे.
Spicejet चा कर्मचाऱ्यांना धक्का: (Spicejet Layoff)
एअरलाइन स्पाइसजेटने नुकतीच 1400 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याची धक्कादायक बातमी समोर आली, यामुळे कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या संख्येत 15 टक्क्यांची घट झाली आहे. सध्या स्पाइसजेटमध्ये 9 हजारांच्या आसपास कर्मचारी कार्यरत आहेत. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार कंपनीने हे पाऊल आर्थिक अडचणी आणि कमी होत असलेल्या प्रवासी संख्येमुळे उचलले आहे. सध्या स्पाइसजेट 30 विमानांचा ताफा चालवतेय, जे 2020 मध्ये असलेल्या 100 विमानांच्या ताफ्यापेक्षा खूप कमी आहे असे म्हटले जाते.
असं म्हणतात की कर्मचाऱ्यांना फोनद्वारे टाळेबंदीची माहिती देण्यात आली होती. यापूर्वीच स्पाइसजेट कडून कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार न मिळण्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. जानेवारी महिन्याचा पगारही अजून कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही. ही सर्व परिस्थिती पहिली तर कंपनी पुढील काही दिवसांत आणखी काही कडक निर्णय घेऊ शकते (Spicejet Layoff) अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.