Stock Market Crash : सेन्सेक्सच्या 1800 पॉइंट घसरणीने बाजार घाबरला! गुंतवणूकदारांची चिंता वाढली

Stock Market Crash : आज सकाळी शेअर बाजार उघडताना अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी दमदार कामगिरी करून दाखवली होती. एवढेच नाही तर आज भारतीय शेअर बाजार हा जगभरातील चौथा मोठा आणि मजबूत शेअर बाजार असल्याची खबर देखील आपल्याला मिळाली, मात्र हा बाजार बंद होत असताना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात जोरदार घसरण झालेली पाहायला मिळाली. सेन्सेक्स (Sensex) मध्ये 1.47 टक्क्यांची घट झाल्यामुळे तो 70,370 वर बंद झाला तर दुसऱ्या बाजूला निफ्टी मध्ये 1.54 टक्क्यांची घट झाल्यामुळे निफ्टी (Nifty) 21,238 वर बंद झाला. याशिवाय बँक निफ्टी (Bank Nifty)45,015 वर बंद झाली तर मिडकॅप निफ्टी (Midcap Nifty) 10353 वर बंद झालेला पाहायला मिळाला. शेअर मार्केट मध्ये झालेल्या या खळबळीमुळे आज सेन्सेक्स एकूण दिवसाच्या हाय लेवल वरून 1804 पॉईंट्सनी घसरला तर निफ्टी लो लेबलवरून 558 अंकांनी घसरत 21,192.60 वर कायम राहिला.

गुंतवणूकदारांना आज सोसावं लागलंय नुकसान: (Stock Market Crash)

शेअर मार्केटमध्ये झालेल्या या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 8.01 लाख कोटी रुपयांची घसरण झाल्याने ही एकूण कमाई 366.39 लाख कोटी रुपयांवर येऊन पोहोचली आहे. आजच्या शेअर बाजारात एचडीएफसी बँक (HDFC Bank), रिलायन्स इंडस्ट्रीज, ॲक्सिस बँक (Axis Bank), हिंदुस्तान युनिलिव्हर, एसबीआय (SBI) अशा मोठमोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झालेली पाहायला मिळाली. दिवसाची सुरुवात जरी दमदार झाली असली तरीही शेवट मात्र चांगला नव्हता, एकूणच BSE वरच्या टॉप शेअर्सनी 52 आठवड्यांचा नीचांक गाठला. एचडीएफसी बँक, हिंदुस्तान युनि लिव्हर, ओरिएंट इलेक्ट्रिक यांसारख्या कंपन्यांचे BSE वरचे शेअर्स आज जबरदस्त आपटले. भारतीय शेअर बाजारातील याच मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे आतापर्यंत सुमारे 6 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप (Market Cap) 368.60 लाख कोटी रुपये झाले, जे गेल्या ट्रेडिंग सत्रात 374.38 लाख कोटी रुपये होते म्हणजेच आज BSE मार्केट कॅप 5.78 लाख कोटी रुपयांनी खाली आले आहे.