Success Story : आपल्या आजूबाजूला अनेक तरुण मंडळी सध्या नोकरीचे क्षेत्र सोडून व्यवसायाकडे वळताना दिसत आहेत. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या व्यवसायांमध्ये अनेक व्यावसायिक यशस्वी होतात तर काहींना उतरती कळा सोसावी लागते. व्यवसाय यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाच्या मनात कष्ट करण्याची ताकद, संयम आणि दृढ आत्मविश्वास असणे महत्त्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला उत्तर प्रदेश मधल्या एका शेतकऱ्याची गोष्ट सांगणार आहोत, ज्याने बहुराष्ट्रीय कंपनी मधील नोकरी सोडून लिंबाच्या बागेत मेहनत घेत भरघोस कमाई करून दाखवली आहे. मोठाल्या कंपनी मधलं काम सोडून शेतीकडे वळलेल्या या सुशिक्षित शेतकऱ्याने इतरांसोबत एक मोठा आदर्श मांडला आहे, त्याच्या या एका निर्णयामुळे आज अनेक शेतकरी लिंबाच्या शेतीकडे वळू लागलेत. तर काय आहे या लेमन मॅनची गोष्ट जाणून घेऊयात….
उत्तर प्रदेश मधला लेमन मॅन आहे तरी कोण? (Success Story)
बहुराष्ट्रीय कंपनीतील नोकरी सोडून लिंबाच्या बागेतून आज भरघोस कमाई करून दाखवणारा उत्तर प्रदेश मधील रायबरेली जिल्ह्यातील आनंद मिश्रा हा शेतकरी सध्या लेमन मॅन म्हणून सर्वत्र चर्चेत आहे. केवळ लिंबाच्या शेतीतून तो दरवर्षी नऊ लाख रुपयांची कमाई करतो. लिंबाचे झाड एकदा मातीत रोवल्यानंतर जवळपास 25 वर्ष ही झाडं आपल्याला फायदा करून देत असतात त्यामुळे या व्यवसायात उतरलेल्या शेतकऱ्यांचा नफा दिवसेंदिवस वाढत जातो.
उत्तर प्रदेश मधल्या रायबरेली जिल्ह्यातील कचनावा या गावात आनंद मिश्रा यांनी लिंबाचा व्यवसाय सुरू केला आहे. बीबीएची (BBA) पदवी मिळवलेल्या आनंद मिश्रा याने वार्षिक सहा लाख रुपयांचे पॅकेज सोडून शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी काहीतरी कार्य करावे म्हणून शेतीच्या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला गहू आणि धान्याचे पिकांमधुन मात्र त्याला फारसा नफा कमवता आला नाही. मात्र म्हणून स्वतःच्या निर्णयावरून तिळमात्रही न डळमळता त्याने शून्यातून नवीन सुरुवात केली. सर्वात आधी लिंबाच्या पिकाबद्दल व्यवस्थित माहिती मिळवली, ज्यातून त्याला लिंबाच्या पिकाला बाजारात वर्षभर मागणी मिळत राहते ही गोष्ट समजली. यानंतर क्षणाचाही विलंब न करता या लेमन मॅनने लिंबाची शेती करण्याचा निर्णय घेतला. (Success Story)
एकदा लागवड केल्यानंतर अनेक वर्ष उत्पन्न देणारं पीक:
बाकी कोणत्याही पिकाच्या तुलनेत लिंबाचे पीक सर्वात अधिक वर्ष नफा मिळवून देऊ शकतं. तसेच लिंबाच्या बागेत जास्तीत जास्त कीटकनाशक वापरण्याची गरज असत नाही, लिंबाच्या पिकाला रोगांचा धोका कमी असल्यामुळे कीटकनाशकांवर होणारा खर्च आटोक्यात ठेवता येतो. लिंबाची ही रोप खास करून पूर्वेकडून पश्चिमेकडे लावावीत, त्यामुळे वाढीसाठी त्यांना पुरेशी हवा आणि प्रकाश मिळाल्याने पिकांची वाढ लवकर व्हायला मदत होते. बाजारात लिंबाच्या पिकाला वर्षभर मागणी असल्यामुळे हा व्यवसाय सातत्याने चालू राहतो. लिंबाचे पीक तुम्हाला वर्षातून दोन वेळा फळ देतं.
आनंद मिश्राच्या बागेत थाई या प्रकारच्या लिंबाची सर्वात अधिक झाडं आहेत. हा लेमन मॅन म्हणतो की या फळांमध्ये बिया कमी अन रस भरपूर असतो. या बागेतून हिवाळ्यात मोठ्या आकाराच्या तर उन्हाळ्यात लहान आकाराच्या लिंबाचे उत्पादन केलं जातं (Success Story). शेतातून विकल्या जाणाऱ्या या लिंबामधून आनंद मिश्रा भरपूर कमाई करतो. त्याच्या म्हणण्यानुसार एका लिंबाच्या झाडापासून तीन हजार ते चार हजार रुपये मिळवले जाऊ शकतात. स्वतः लेमन मॅन दोन एकर बाग कामातून दरवर्षी नऊ लाख रुपयांपर्यंत निव्वळ उत्पन्न मिळवतो अशी माहिती त्याने सांगितली केली आहे. आजकालच्या जगात बहुतांश मंडळी व्यवसायाकडे वळत असल्यामुळे आपण नवख्या आणि ग्राहकांना हव्या असलेल्या व्यवसायाची निवड करावी. बाजारात नेमक्या कोणत्या गोष्टींची सर्वाधिक गरज आहे हे ओळखून व्यवसाय सुरू करावा, जेणेकरून येणाऱ्या काळात भरपूर नफा कमवला जाऊ शकतो.