Suchana Seth: आपल्या आजूबाजूला अनेक वेळा ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या घटना घडत असतात. मात्र जगात कितीही क्रूर प्रकार घडत असले तरीही ‘आई’ कधीच आपल्या मुलाचा द्वेष करू शकत नाही असं म्हणतात, मात्र समोर आलेली ही बातमी काही वेगळंच चित्र उभं करते. अलीकडेच गोव्यात घडलेल्या घटनेवर कदाचित तुमचा विश्वास देखील बसणार नाही. आई आणि मुलाच्या प्रेमळ नात्यावर प्रश्नचिन्ह उभारणारी ही घटना आर्टिफिशल इंटेलिजन्स कंपनीची महिला सीईओ सूचना सेठ यांच्या बद्दल आहे. सध्या चर्चेत असलेली ही बातमी सांगते की, सूचना सेठ यांनी आपल्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केली. एवढेच नाही तर मुलाचा जीव घेतल्यानंतर त्याचं प्रेत लपवण्यासाठी बॅगमध्ये भरून ती गोव्याहून कर्नाटकला निघाली होती. मात्र पोलिसांना या घटनेची खबर वेळेतच लागल्याने त्यांनी अपराधी महिलेला त्वरित ताब्यात घेतले. ही महिला एक व्यवसाय चालवते, माईंड फुल AI या व्यवसायाची सुरुवात 2020 मध्ये स्वतः सूचना सेठ यांनी केली होती. मात्र सध्या त्यांच्याबद्दल उघडकीस आलेली ही बातमी केवळ व्यापारी क्षेत्रालाच नाही तर संपूर्ण देशालाच हादरून टाकणारी आहे.
सूचना सेठ आहे AI कंपनीची CEO:
4 वर्षांच्या मुलाची हत्या केलेली ही आई माईंड फुल या त्यांच्या कंपनीद्वारे डेटा सायन्सच्या गटांना आणि स्टार्ट अप्सना सल्ला देण्याचं काम करते. यासह, तिची कंपनी मशीन लर्निंग सोल्यूशन्स प्रदान करते. तब्बल बारा वर्षांचा व्यावसायिक अनुभव असलेली ही महिला वर्ष 2022 मध्ये AI Ethicsच्या टॉप-100 महिलांपैकी एक होती.
सूचना सेठ (Suchana Seth) हिने हावर्ड युनिव्हर्सिटी मधून फेलोशिप मिळवली होती. बर्कमन आणि डेटा अँड सोसायटी येथे व्यवसायात एथिकल मशीन लर्निंग आणि AI कार्यान्वित करण्याच्या पद्धतींचा अभ्यास केला होता. यानंतर, 2020 मध्ये तिने द माइंडफुल नावाच्या AI लॅबची स्थापना केली, जी एक AI आधारित स्टार्टअप आहे. एवढेच नाही तर तिच्याकडे आर्टिफिशल लँग्वेज, मशीन लर्निंग, नॅचरल लैंग्वेज प्रोसेसिंग आणि टॅक्स मायलिंग सेक्टर अशी चार अमेरिकन पेटंट आहे. सूचना सेठ हीचा आजवरचा प्रवास पाहता ती वैयक्तिक आयुष्यात एवढा निर्घृण प्रकार करू शकते यावर विश्वास बसत नाही.
कसा झाला Suchana Seth प्रकरणाचा खुलासा:
स्वतःच्या मुलाची हत्या केलेली ही आई गोव्याच्या कांदोली मधल्या एका हॉटेलमध्ये आपल्या मुलासह राहत होती. मात्र जेव्हा ती हॉटेलमधून बाहेर निघाली तेव्हा तिचं मूल सोबत नव्हतं. आजूबाजूला असलेल्या हॉटेल स्टाफला म्हणूनच या महिलेवर संशय निर्माण झाला, तिने हॉटेलमधून चेक आऊट केल्यानंतर शंकेची सुई मनात धरलेल्या हॉटेल स्टाफने तिच्या खोलीची तपासणी केली जिथे त्यांना रक्ताचे डाग सापडल्याने त्यांनी सदर माहिती त्वरित जवळच्या पोलीस खात्यात नोंदवली.
पोलिसांनी ही गंभीर माहिती मिळताच वेळ दवडला नाही व लगेचच या महिलेचा शोध सुरू केला. ज्या टॅक्सी मधून ही महिला निघाली होती त्या टॅक्सीवाल्याचा नंबर मिळवून पोलिसांनी त्याला सर्व घटनेची माहिती दिली. पोलिसांच्या माहितीनुसार हा टॅक्सी चालक त्या महिलेला कर्नाटकातील चित्रदुर्ग पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेला आणि तिथेच सूचना सेठ (Suchana Seth) हिच्या हातात गोवा पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आल्या.