बिझनेसनामा । आपल्या मुलींच्या भवितव्याची प्रत्येक पालकांना खूप चिंता वाटत असते. त्यांच्या भविष्यासाठी विशेषत: लग्नासाठी पालकांकडून अनेक प्रकारे नियोजन केले जाते. आपल्या मुलीचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असावे अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. जर आपल्यालाही मुलीच्या आर्थिक भविष्याची काळजी सतावत असेल तर आपण सुकन्या समृद्धी योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता.
हे लक्षात घ्या कि, सुकन्या समृद्धी योजना ही खास फक्त मुलींसाठीच बनवण्यात आलेली एक सरकारी योजना आहे. यामध्ये जास्त व्याजाबरोबरच टॅक्स सूट देखील मिळते. तसेच ही एक सुरक्षित गुंतवणूक योजना असून यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या रकमेची देखील गरज नाही. यामध्ये अगदी 250 रुपयांमध्येही गुंतवणूक सुरू करता येईल.
व्याज दर जाणून घ्या
सुकन्या समृद्धी योजनेमध्ये 7.6 टक्के व्याज दिले जाते. यामध्ये मुलीच्या वयाच्या 10 व्या वर्षापासून खाते सुरु करता येते. तसेच मुलीच्या वयाच्या 21 व्या वर्षी पैसे काढता येतील. या योजनेमध्ये गुंतवलेले पैसे 9 वर्षे 4 महिन्यांत दुप्पट होतात. म्हणजेच जर आपण दररोज 100 रुपयांच्या हिशेबाने पैसे गुंतवले तर 9 वर्षांत 15 लाख रुपये मिळतील. तसेच, जर यामध्ये दररोज 416 रुपयांच्या हिशेबाने पैसे गुंतवले तर मॅच्युरिटीवर 65 लाख रुपये मिळतील.
अशा प्रकारे उघड खाते
कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा व्यावसायिक बँकेच्या अधिकृत शाखेत Sukanya Smiriddhi Yojana योजनेअंतर्गत खाते उघडता येते. या योजनेअंतर्गत एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करता येतील. तसेच यामध्ये एकदा खाते उघडल्यानंतर, मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत किंवा 18 वर्षांची झाल्यानंतर तिचे लग्न होईपर्यंत ते सुरू ठेवता येईल. इथे हे लक्षात घ्या कि, या योजनेअंतर्गत प्रत्येक घरात फक्त दोनच सुकन्या समृद्धी योजना खाती उघडता येतील. यामध्ये एका मुलीसाठी फक्त एकच खाते उघडले जाईल. मात्र एखाद्या कुटुंबात जुळ्या मुली जन्माला आल्यास त्यांची खाती उघडता येतील. यामध्ये जास्तीत जास्त 15 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. तसेच त्यानंतर गुंतवणूक करण्याची गरज नाही. यावर मॅच्युरिटीपर्यंत व्याज मिळत राहील.