Sukanya Samriddhi Yojana : काळ कितीही बदलला असला तरी आज देखील स्त्री शिक्षण किंवा महिलांच्या आत्मनिर्भरतेवर काही भागांमध्ये प्रश्नचिन्ह अजूनही कायम आहे. आपला देश हा भल्या मोठ्या लोकसंख्येसाठी ओळखला जातो, त्याचे भौगोलिक क्षेत्र देखील मोठे आहे त्यामुळे देशातील काही भागांमध्ये आजही महिलांना शिक्षण घेण्याची किंवा बाहेर पडत नोकरी करण्याची संधी उपलब्ध करून दिली जात नाही. देशाच्या काही कोपऱ्यांमध्ये अगदी आतपर्यंत अनेक नवजात मुली या स्त्रीभ्रूणहत्येच्या शिकार बनत आहेत. मुलगी म्हटलं की घरच्यांच्या डोक्यावर ती ओझंच बनेल अशी जुनी संकल्पना आपण कायम मनात धरून आहोत. मात्र हे जुनाट आणि विकृत विचार पुसून टाकण्यासाठी, तसेच महिलांचे जीवन सुखकर बनवण्यासाठी, त्यांना शिक्षणाचा मानवी हक्क मिळवून देण्यासाठी सरकारकडून वेळोवेळी अनेक योजना राबवल्या जातात. सुकन्या समृद्धी योजना ही याच अनेक योजनांपैकी एक आहे. अवघ्या एक दिवसानंतर आपण नवीन वर्षात प्रवेश करणार आहोत, आणि नवीन वर्षाची भेट म्हणून भारत सरकारकडून देशभरातील महिलांना सुकन्या समृद्धी योजनेद्वारे एक मोठी भेट देण्यात येणार आहे.
सुकन्या समृद्धीतील गुंतवणूकदारांना मिळणार जास्त व्याज : (Sukanya Samriddhi Yojana)
नवीन वर्षाच्या सुरुवातीला सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सरकारने एक विशेष भेट देऊ केली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीत योजनेचे व्याजदर 8 टक्क्यांवरून 8.2% पर्यंत वाढवण्यात आले आहेत. केवळ एवढेच नाही तर तीन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात येणाऱ्या गुंतवणुकीवर आता 7 टक्कयांऐवजी 7.1 टक्के व्याज देण्यात येईल. नवीन वर्षाच्या सुरुवातीला अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने छोट्या बचत योजनांच्या व्याजदरांचे पुनरावलोकन केले. यामध्ये इतर कुठल्याही लहान बचत योजनांच्या व्याजदरांमध्ये बदल केलेले नसून केवळ सुकन्या समृद्धी योजनेच्या (Sukanya Samriddhi Yojana) गुंतवणूकदारांना ही खास भेट देण्यात आली आहे.
देशातील मुलींचे जीवन सुखकर बनवणाऱ्या या योजनेत मिळणाऱ्या व्याजात दरवाढ करण्यात आली असून, या वाढीचा फायदा अधिकाधिक मुलींना मिळावा म्हणून सरकार प्रयत्नशील आहे. या आधी देखील चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुकन्या समृद्धी योजनेचे व्याजदर 7.6% वरून 8 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले होते. याचाच अर्थ असा कि चालू आर्थिक वर्षात सरकारने दुसऱ्यांदा सुकन्या समृद्धी योजनेचे व्याजदर वाढवले आहेत.
बाकी छोटे गुंतवणूकदार मात्र निराश:
नवीन वर्ष म्हटलं कि आपोआपच काही आनंदाची बातमी मिळावी अशी इच्छा निर्माण होते. सरकारकडून देशातील मुलींना सुकन्या समृद्धीचा (Sukanya Samriddhi Yojana) लाभ मिळवून देण्यात आला असला तरीही इतर कुठल्याही प्रकारच्या छोट्या योजनेत बदल करण्यात आलेले नाहीत. देशात प्रसिद्ध असलेल्या आणि छोट्या गुंतवणूकदारांच्या पसंतीत उतरलेल्या पोस्ट ऑफिस योजनेत देखील कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. आजही पीपीएफ (PPF) मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना केवळ 7.1% व्याजदर दिलं जात आहे. एप्रिल 2020 पासून आत्तापर्यंत PPFमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. सुकन्या समृद्धीच्या बातमीनंतर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PPFमध्ये बदल न घडवल्यामुळे पीपीएफ(PPF) चे गुंतवणूकदार पुन्हा एकदा निराश झाले आहेत.