बिझनेसनामा ऑनलाईन । जागतिक अभियांत्रिकी आणि डिजिटल सेवा कंपनी टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड 2023-24 या वर्षात 1,000 हून अधिक महिला इंजिनिर्सची नियुक्ती करणार आहे. आपल्या कर्मचार्यांमध्ये लैंगिक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यामुळे महिलांसाठी टाटा मध्ये नोकरीची मोठी सुवर्णसंधी आहे.
टाटा टेक्नॉलॉजीजने एका निवेदनात म्हटले आहे की, कंपनीने महिलांना प्रोत्साहन देत लैंगिक विविधता-आधारित भरती मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला ‘रेनबो’ असं नाव देण्यात आलं आहे. या मोहिमेअंतर्गत कंपनी जास्तीत जास्त महिलांची भरती करणार आहे आणि त्यांना जीवनात अजून यशस्वी होण्यासाठी त्यांना संधी देण्याचा प्रयत्न करणार आहे. तशी व्यवस्था कंपनीने निर्माण केली आहे.
महिला कर्मचाऱ्यांमध्ये असलेली नेतृत्व क्षमता विकसित करण्यासाठी आणि महिलांना त्यांच्या करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी कंपनी हे काम करत आहे. “लीडरब्रिज-विंग्ज प्रोग्राम” द्वारे भविष्यासाठी महिलांचे नेतृत्व तयार करून त्यांच्या करिअरच्या विकासावरही लक्ष केंद्रित करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. 2024 च्या आर्थिक वर्षात 1000 पेक्षा जास्त महिला इंजिनिर्सची नियुक्ती करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.