Tesla Pune Office । अमेरिकेची इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाने भारतामध्ये मोटर वेहिकल्सचा बिजनेस वाढवण्यासाठी पहिले पाऊल उचलले आहे. काही दिवसांपूर्वी टेस्लाच्या दोन सिनियर अधिकाऱ्यांनी मॅन्युफॅक्चरिंग प्लांटसाठी भारतातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली होती. आता हाती आलेल्या माहितीनुसार टेस्ला इंडिया मोटर अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडने महाराष्ट्रात एक ऑफिस प्लेस भाड्याने घेतलं आहे. विशेष म्हणजे टेस्लाचे हे भारतातील पहिलेवहिले ऑफिस पुण्यात सुरु होणार आहे.
विमाननगर परिसरात Tesla चं ऑफिस – (Tesla Pune Office)
टेस्लाने हे ऑफिस पुण्यातील पंचशील बिजनेस पार्कमध्ये बी विंगच्या पहिल्या मजल्यावर घेतलं असून विमान नगर मध्ये असलेलं हे ऑफिस 5850 स्क्वेअर फूट आहे. यासाठी टेस्लाने टेबल स्पेस टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासोबत 5 वर्षाचा करार केला आहे. टेस्लाला या ऑफिससाठी (Tesla Pune Office) दर महिन्याला 11.65 लाख रुपये आणि एकूण 34.95 लाख रुपये डिपॉझिट भरावे लागणार आहे. 1 ऑक्टोंबर 2023 पासून या ऑफिसचं भाडं सुरू होणार असून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ रोड पासून हे ऑफिस जवळच असणार आहे.
मोदी – मस्क भेटीनंतर वेग –
मागच्या आठवड्यामध्ये टेस्लाच्या अधिकाऱ्यांनी भारतात इलेक्ट्रिक कार विकण्यासाठी इसेंटिव्ह आणि बेनिफिट्सवर चर्चा केली होती. त्यासाठी त्यांनी वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांची भेट घेतली. यावरून टेस्ला सरकारसोबत सहमत असून आता भारतामध्ये टेस्ला त्यांचे उत्पादन युनिट स्थापन करणार आहे हे स्पष्ट झालं. जून महिन्यात मोदींच्या अमेरिका दौऱ्यात एलॉन मस्क यांनी मोदींची भेट घेतली होती, त्या भेटीनंतर आपण भारतात मॅनुफॅक्चरिंग प्लांट सुरु करण्यास इच्छुक असल्याचे मस्क यांनी म्हंटल होते. अखेर टेस्लाचे आता एक पाऊल पुढे टाकत पुण्यात भाड्याने (Tesla Pune Office) ऑफिस घेतलं आहे.