Thali Rate Reduced : हॉटेलमधील जेवण झालं स्वस्त; व्हेज की नॉन व्हेज? फायदा कोणाला?

Thali Rate Reduced : केल्या काही दिवसांत कांदा आणि टोमॅटो या भाज्यांच्या किमती गगनाला भेटल्या असल्याने अनेक सामान्य कुटुंबांना याचा त्रास सहन करावा लागला होता. शाकाहारी किंवा मांसाहारी कुठल्याही प्रकारच्या जेवणामध्ये कांदा आणि टोमॅटो हे नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावत असतात, भारतात तर या दोन घटकांशिवाय जेवण हे अपूर्णच आहे. कांदा आणि टोमॅटो यांच्या अचानक वाढलेल्या किमतींमुळे कित्येक सामान्य घरातील मासिक नियोजन बिघडले होते. अनेक सामान्य कुटुंबांना महागाईचा सामना करावा लागला होता. मात्र आता गेल्या डिसेंबर महिन्यात टोमॅटो आणि कांदा यांच्या किमतीत काही अंशी घट झाल्याने शाकाहारी तसेच मांसाहारी जेवणाची थाळीच्या किमतीमध्ये घसरण झाली आहे. आत्ताच्या घडीला शाकाहारी जेवणाच्या थाळीत 3 टक्क्यांची घट नोंदवली गेली असून मांसाहारी जेवणाच्या थाळीमध्ये 5 टक्क्यांची घट झाली आहे. बाजारी परिस्थितीचा अंदाज घेता आता शाकाहारी थाळी की मांसाहारी थाळीची निवड करावी हे जाणून घेऊया!!

बाजारात शाकाहारी की मांसाहारी थाळी स्वस्त? (Thali Rate Reduced)

काही बाजारी तज्ञांच्या मतानुसार डिसेंबर महिन्यात कांद्याच्या किमतीमध्ये 14 टक्क्यांची तर टोमॅटोच्या किमतीमध्ये 3 टक्क्यांची घट झाली. देशांतर्गत वार्षिक साजरे केले जाणारे महत्त्वाचे सर्व सण आणि उत्सव म्हणजेच चतुर्थी आणि दिवाळी हे सुद्धा आता पूर्ण झाले आहेत, त्यामुळे अधिकाधिक वापरात असलेल्या फळभाज्यांच्या किमती कमी झाल्या आहेत. याच फळभाज्यांच्या किमती कमी झाल्याने शाकाहारी तसेच मांसाहारी थाळीची किंमत देखील घटलेली पाहायला मिळते. मात्र या सर्व परिस्थितीत नेमकी कोणती थाळी स्वस्त हे उलगडून पाहावे लागेल.

ब्रॉयलरच्या किमतीत 5 ते 7 टक्के घट झाल्यामुळे मांसाहारी थाळीची किंमत झपाट्याने कमी झाल्याचे बाजारातील तज्ञांचे मत आहे. मांसाहारी थाळीच्या खर्चात ब्रॉयलरचा वाटा 50 टक्के असतो. धान्य, कडधान्ये, ब्रॉयलर, भाजीपाला, मसाले, खाद्यतेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतींनुसार थाळीच्या किमती बदलतात अशी माहिती समोर आली आहे(Thali Rate Reduced). त्यामुळे लक्ष्यात घ्या कि बाजारात मिळणाऱ्या जेवणाच्या थाळीची किंमत अनेक घटकांच्या आधारे ठरवली जाते.

वार्षिक आधारे शाकाहारी जेवण महागलं:

तज्ञांनी सादर केलेल्या अहवालानुसार सध्या शाकाहारी जेवणाची किंमत मांसाहाराच्या तुलनेत अधिक आहे. शाकाहारी थाळीच्या किमतीत 12 टक्क्यांची वाढ झाल्याने ही थाळी 4 टक्के घट झालेल्या मांसाहारी जेवणापेक्षा बरीच महाग झालेली दिसून येते. शाकाहारी जेवणाची किंमत अशी अचानक का महागली याचे प्रमुख उत्तर आहे कांदा आणि टोमॅटो यांच्या किमती. कांद्याच्या किमतीमध्ये 82 टक्के तर टोमॅटोच्या किंमतीमध्ये 42 टक्क्यांची वाढ झाल्याने शाकाहारी जेवणाच्या थाळीमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते.