बिझनेसनामा ऑनलाईन । देशात रस्त्यांचे जाळे अधिक सक्षम करण्यावर केंद्र सरकारचा (Government) भर आहे. मागील काही वर्षात हजारो किलोमीटरचे महामार्ग सरकारने नव्याने बनवले असून यामुळे दळणवळण सुविधा अधिक जलद झाली आहे. नवीन महामार्गांवर टोल नाके (Toll Plaza) उभारलेले असून टोलसाठी मात्र वाहनांच्या लांब रांगा लागत असल्याने टोल प्लाझा हटवण्याबाबत सरकार विचार करत होते. आता याबाबत एक अतिशय महत्वाची माहिती समोर आली आहे.
आता देशातील प्रमुख महामार्गावर वाहन चालकांना टोल द्यावा लागणार नाही. महामार्गावरील सर्व टोलनाके पुढील ६ महिन्यात हटवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली आहे. येत्या 6 महिन्यांत GPS आधारित टोल संकलन प्रणालीसह नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात येणार असून यानंतर सर्व टोल नाके बंद करण्यात येणार आहेत.
वाहतुकीची कोंडी कमी करणे आणि महामार्गावरून प्रवास केलेल्या नेमक्या अंतरासाठी वाहनचालकांकडून शुल्क आकारणे हा या निर्णयाचा उद्देश असल्याचे गडकरी यांनी सांगितले आहे. सरकारी मालकीच्या NHAI चा टोल महसूल सध्या 40,000 कोटी रुपये आहे आणि तो 2-3 वर्षांत 1.40 लाख कोटी रुपयांवर पोहोचणार आहे. देशातील टोल प्लाझा बदलण्यासाठी GPS-आधारित टोल प्रणालीसह नवीन तंत्रज्ञानाचा सरकार विचार करत आहे. यामुळे वाहने न थांबवता स्वयंचलित टोल संकलन सक्षम करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय स्वयंचलित नंबर प्लेट रीडर कॅमेऱ्यांचा एक पायलट प्रकल्प चालवत आहे.
टोल प्लाझावर सरासरी व्यक्ती किती वेळ थांबते?
2018-19 मध्ये टोल प्लाझावर वाहनांची सरासरी प्रतीक्षा वेळ 8 मिनिटे होती. 2020-21 आणि 2021-22 मध्ये FASTag लागू केल्यामुळे, वाहनांची सरासरी प्रतीक्षा वेळ 47 सेकंदांवर आली आहे. काही ठिकाणी, विशेषत: शहरांजवळील वाट पाहण्याच्या वेळा लक्षणीयरीत्या सुधारल्या असल्या तरी, दाट लोकवस्तीच्या शहरांमध्ये गर्दीच्या वेळेत टोल प्लाझावर अजूनही काही विलंब होतो.