Twitch Layoffs: नवीन वर्षातही नोकऱ्यांवर गंडांतर? आता जेफ बेजोस 500 कर्मचाऱ्यांना नारळ देणार

Twitch Layoffs : गेल्या वर्षभरात आपण अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना कायमचं कामावरून काढून केल्याच्या कित्येक बातम्या पाहिल्या. जगभरात महागाई वाढत असताना Microsoft, Google, LinkedIn, Spotify यांसारख्या दिग्गज कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. वर्ष बदलेलं असलं तरीही कर्मचाऱ्यांना निष्कासित करण्याची प्रक्रिया इथेच थांबलेली नाही. आता अमेझॉनचे सर्वेसर्वा जेफ बेजोस (Jeff Bezos) पुन्हा एकदा त्यांच्या Twitch या उपकंपनीतील काही कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहेत अशा चर्चा सुरु आहेत. परंतु अद्याप कंपनीने याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.

जेफ बेजोस हे जगभरातील अनेक श्रीमंत व्यावसायिकांपैकी एक आहेत आणि त्यांची कंपनी म्हणजेच अमेझॉन. या अमेझॉन कंपनीनेच काही दिवसांपूर्वी लाईव्ह स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म चालवणाऱ्या Twitch या कंपनीचे अधिग्रहण केले होते. आणि आता माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार जेफ बेजोस या कंपनी मधल्या काही कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार आहेत. ब्लूमबर्गने एका अहवालात सादर केलेली माहिती सांगते की आता बेजोस यांच्या अखत्यारीखाली येणाऱ्या या कंपनीमधून 35 टक्के कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात येईल. कंपनीकडून अद्याप याबद्दल कुठलीही माहिती स्पष्ट झालेली नसली तरीही इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर फिरणाऱ्या बातम्यामुळे टांगती तलवार कायम आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच कंपनी मधले टॉप एक्झिक्यूटिव्ह नोकरी सोडून गेले होते, या अधिकाऱ्यांमध्ये चीफ प्रोडक्ट ऑफिसर, चीफ कस्टमर ऑफिसर आणि चीफ कन्टेन्ट ऑफिसर इत्यादींचा समावेश होता.

डिसेंबर महिन्यात कंपनीने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण कोरिया बाजारातून ती आपला व्यवसाय उठवण्याच्या मार्गावर आहे. या आधी देखील कंपनीने काही कर्मचाऱ्यांना निष्कासित केले होते आणि आता पुन्हा एकदा या बातम्यांच्या आधारे कंपनी कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या तयारीत आहे. ट्वीचची पालक कंपनी म्हणजेच अमेझॉन यामध्ये देखील वर्ष 2022 मध्ये 27 हजार कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.

जेफ बेजोस 500 कर्मचाऱ्यांना नारळ देणार : (Twitch Layoffs)

ब्लूमबर्गच्या माहितीनुसार सध्या ट्विच या कंपनीमधून जवळपास 500 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याचा विचार केला जात आहे (Twitch Layoffs). अमेझॉनने नऊ वर्षांपूर्वी या कंपनीचा अधिग्रहण केले होते. अधिकाधिक नफा मिळवण्यासाठी गेल्या काही वर्षात कंपनीने एडवर्टाइजमेंट वर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले असूनही त्यांना म्हणावा तसा नफा मिळाला नाही, व म्हणूनच आता अधिकाऱ्यांना कामावरून काढण्याची तयारी सुरू झाली आहे.